उन्हाळी सुटीतही हायकोर्टात ‘कोरोना’ सुनावणी सुरु राहणार

Bombay High Court

मुंबई : कोरोना महामारी (Corona) आणि त्याची सरकारी यंत्रणेकडून केली जाणारी हाताळणी यासंबंधीच्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) मुख्य न्यायाधीशांचे खंडपीठ उन्हाळी सुट्टीतही सुनावणी सुरु ठेवणार आहे.उच्च न्यायालयास १० मे ते ६ जून अशी उन्हाळी सुट्टी आहे.

कोरोना संबंधीच्या काही जनहित याचिकांवर मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी व्हायची होती. परंतु वडिलांच्या निधनामुळे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हजर नव्हते. त्यामुळे मंगळवारची सुनावणी आता गुरुवारी होईल, असे सांगताना मुख्य न्यायाधीशांनी असेही स्पष्ट केले की, उन्हाळी सुट्टीतही हे खंडपीठ कोरोनासंबंधीच्या प्रकरणांची सुनावणी सुरु ठेवणारआहे.

इस्पितळांना आगी लागून त्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटनांची दखल घेत न्यायालयाने स्वत:हून हाती घेतलेल्या प्रकरणाची व्याप्ती वाढवून हाही विषय त्यात घेत असल्याचे  गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसेल तर इस्पितळे सरळ बंद करा, असेही न्यायालयाने त्यावेळी सरकारला सुचविले होते. अशा घटनांना महाभारतामधील ‘लक्षागृहा’ची उपमा देत न्यायमूर्ती म्हणाले होते की, लोक बरे होण्यासाठी इस्पितळात दाखल होत असतात. अशा अकल्पित मृत्यूची ते स्वप्नातही कल्पना करू शकत नसतील.

सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) कोरोनासंबंधी स्वत:हून हाती घेतलेल्या प्रकरणाची उन्हाळी सुट्टीतही सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टीही १० मेपासूनच सुरु होणार आहे. पण न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने कोरोना प्रकरणाची पुढील सुनावणी सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठेवली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button