काँग्रेसने बिहारमधील पराभवाची दखल घेतली नाही, सिब्बल यांच्या वक्त्यावरून गहलोत संतापले; दोघे भिडले

ashok gehlot and kapil sibbal

नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या निवडणुकीतल पराभवाची काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही दखल घेतलेली दिसत नाही, असे वक्तव्य कपिल सिब्बल यांनी केल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) पक्षनेतृत्वाच्या बचावात उतरले. त्यांनी ट्विट केले – कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांना पक्षांतर्गत बाब माध्यमांमध्ये मांडण्याची गरज नव्हती. सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

सिब्बल म्हणाले होते – अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होते आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही. अशोक गेहलोत यांनी एका पाठोपाठ ५ ट्वीट केले. (Ashok Gehlot said there is no need for Mr Kapil Sibal to mentioned our internal issue in Media )
गेहलोत म्हणालेत – काँग्रेसनं यापेक्षा खडतर परिस्थिती पाहिली आहे. १९६९, १९७७, १९८९, आणि १९९६ मध्ये पक्षाची स्थिती खराब झाली होती. पण, मजबूत वैचारिक पाया, पक्षाचे कार्यक्रम, धोरण, केंद्रीय नेतृत्वावर ठाम विश्वास याच्या जोरावर लोकांनी पुन्हा काँग्रेसला स्वीकारले.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक संकटातून मार्ग काढत त्यावर मात करत आलो आहोत. २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच सरकार स्थापन केले होते, याची आठवण अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना करुन दिली. निवडणुकीतील पराभवासाठी वेगळी कारण असतील. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसने उभारी घेतली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पक्षनेतृत्वावर ठाम विश्वास असल्यामुळे हे शक्य झाले आहे. संपूर्ण भारताला एकत्र ठेवणारी काँग्रेस हीच एकमेव पार्टी आहे. काँग्रेसच देशाला एकात्मिक विकासकडे नेऊ शकते, असे अशोक गेहलोत म्हणालेत.

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नाही, अशी खंत कपिल सिब्बल यांनी बोलून व्यक्त केली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, असे सिब्बल म्हणालेत.

आपली घसरण होते आहे, हे काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे. आपले कुठे चुकते, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र, त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.