काँग्रेसची खाट पुन्हा कुरकुरली : नाराज आमदार सोनियांना भेटणार

Sonia Gandhi

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासूनच तिन्ही पक्षांत कुरबुरी सुरूच आहेत. विशेषकरून सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला दुजाभाव मिळत असल्याचे उघडपणे म्हटले आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसची खाट कुरकुरायला लागली आहे. काँग्रेसमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. या नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आता थेट काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली असल्याचे वृत्त ‘टीव्ही-९ मराठी’ने दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाबाबत अनेक काँग्रेस (Congress) नेते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ते आपली नाराजी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त करणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमवार किंवा मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वी नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यासह आणखी काही काँग्रेस मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. समन्वय समितीतून नाराजी दूर होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे काँग्रेस मंत्री सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करतील, अशीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीत महाष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली.

राज्य मंत्रिमंडळाची २३ जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करून, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्या नाराजीची बातमी कुणी तरी पेरली असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसदेखील महत्त्वाचा पक्ष आहे. मात्र, या सरकारमधून काँग्रेसला योग्य तो सन्मान दिला जात नाही, असं काँग्रेस मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या या तक्रारीवर सोनिया गांधी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं आहे; पण काँग्रेस नेत्यांची सततची नाराजी महाविकास आघाडी सरकारला गोत्यात आणू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER