काँग्रेसचाही पवारांच्या सुरात सूर; देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे केले स्पष्ट

Sharad Pawar - Balasaheb Thorat

मुंबई :- परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज देशमुख्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. देशमुखांचा  राजीनामाच नाही तर चौकशीचीही गरज नसल्याचे पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. आता काँग्रेसनेही पवारांच्या निर्णयाला योग्य असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आज काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक वेळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रीतीने व्हावी, हीच आमची भूमिका असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र पाठवण्यामागे परमबीर सिंग यांच्यावर कुठला तरी दबाव आहे. त्यातूनच त्यांनी हे पत्र दिलं असावं असं वाटतं. पत्र दिलं गेलं म्हणून राजीनामा घेणं, हे योग्य नाही. तसेच सत्ता नसल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.

ही बातमी पण वाचा : लेटर बॉम्बवरुन काँग्रेस नाराज, देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी एच के पाटील यांचं निवेदन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER