राजाराम कारखान्याच्या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष

Satej Patil

कोल्हापूर :- छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणूक पुढे गेली असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गटाची प्रचाराची व्युह रचना सुरूच आहे. राजाराम कारखान्याची सत्ता ही जिल्ह्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरणार आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक अशीच ही निवडणूक होणार असल्याने उमेदवार कोण? असणार याची चर्चाही होत नाही. महादेवराव महाडिक यांच्या वर्चस्वाखाली हा कारखाना कायमपणे चर्चेत राहिला. त्याच्या सर्वसाधारण सभा गाजत राहिल्या. मात्र, राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू हे त्याचे स्वरूप आजही कायम आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाडिक यांना जो राजकीय सेट बॅक बसला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या या निवडणुकीला पाटील आणि महाडिक या दोन्ही गटांच्या दृष्टीने कमालीचे महत्त्व आहे.

सीएए-एनआरसीविरोधात उद्धव ठाकरेंना ठराव मांडायला लावू : काँग्रेस

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्याकडे या कारखान्याचे सहकारीकरणाचे श्रेय जाते; मात्र नंतरच्या काळात हा कारखाना ज्यांच्या ताब्यात देण्यात आला, ते भगवानराव पवार आणि त्यांचे सहकारी यांना तो राखण्यात यश आले नाही. महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात हा कारखाना आला. नंतरच्या काळात महाडिक आणि पाटील यांच्यात उघड संघर्ष सुरू झाल्यानंतर सभा आणि निवडणुका गाजू लागल्या. आपल्या गावात कसबा बावड्यातील सत्ता केंद्र आपल्या ताब्यात नाही, याची पाटील गटात मोठी खंत आहे. त्यामुळे हा कारखाना जिंकायचा या जिद्दीने ते उतरत आहेत. त्याच वेळी महाडिकांच्या ताब्यात गोकुळ संघ आणि राजाराम कारखाना ही दोनच सत्तास्थाने आहेत. ती टिकविण्यासाठी त्यांना पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे.

त्याची सुरुवात मतदार यादीतून झाली आहे. धनंजय महाडिक, अमल महाडिक, सौ. शौमिका महाडिक हे सगळे भाजपमध्ये आहेत. यापूर्वीच कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाआघाडी सत्तेवर आहे. आता राज्यातही अशीच आघाडी सत्तेवर आली असून या तिन्ही पक्षांना जिल्ह्यात मंत्रीपदे मिळाली आहेत. काँग्रेसचे सतेज पाटील गृह राज्यमंत्री आहेत, हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री आहेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेनेच्या कोट्यातून आरोग्य राज्यमंत्री आहेत. या सार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान देत महाडिकांना राजाराम आणि गोकुळ दूध संघाच्या सत्तेची नौका पैलतिरावर न्यायची आहे.