न्यायसंस्थेचे वर्तन हाच लोकांच्या तिच्यावरील विश्वासाचा आधार

Kunal Kamra & SC
  • ‘कन्टेम्प्ट’ प्रकरणात कुणाल कर्माचे प्रतिपादन

नवी दिल्ली :- भारताचे सर्वोच्च न्यायालय हे जगातील सर्वांत शक्तिशाली न्यायालय आहे. मी केलेल्या ट्विट किंवा विनोदामुळे अशा बलवान न्यायालयाचा पाया हादरू शकतो, असे म्हणणे म्हणजे माझ्या ताकदीचे अवास्तव आकलन करणे आहे, असे सांगत ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ कुणाल कर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्याच्याविरुद्ध प्रस्तावित केलेल्या न्यायालयीन अवमानना प्रकरणात माफी मागण्यास साफ नकार दिला आहे.

कर्मा यांनी ट्विटरवरून सर्वोच्च न्यायालयावर जी टीका-टिप्पणी केली होती ती प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान करणारी आहे, असा अभिप्राय देत अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी कर्मा यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची याचिका दाखल करण्यास संमती दिली होती. त्यानंतर कायद्याच्या काही विद्यार्थ्यांनी व काही वकिलांनी औपचारिक याचिका दाखल केली. त्यात न्यायालयाने नोटीस काढल्यावर कर्मा यांनी आता उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

कर्मा म्हणतो, लोकांच्या आपल्यावरील विश्वासास न्यायालय जसे महत्त्व देते त्याचप्रमाणे कोणी तरी केलेल्या ट्विट  किंवा विनोदाच्या आधारे लोक न्यायालयाविषयी स्वत:चे मत बनवून घेणार नाहीत यावरही न्यायालयाने विश्वास ठेवायला हवा. न्यायसंस्थेवरील लोकांचा विश्वास न्यायसंस्थेच्या स्वत:च्या वर्तनावर अवलंबून असतो, कोण काय टीका-टिप्पणी करतो त्यावर नव्हे.

कर्मा यांनी प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले की, लोकशाहीत शक्तिशाली संस्थेवर टीका केली जाऊ शकत नाही हे म्हणणे ‘बिनडोक’पणाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये स्थलांतरित मजुरांना ‘घरी परत जाण्याचा मार्ग तुमचा तुम्ही शोधा’ असे सांगण्याएवढेच अकार्तिक आणि लोकशाहीविरोधी आहे. लोक टीका करतात किंवा टर उडवतात एवढ्याने न्यायाधीशांना त्यांचे न्यायदानाचे काम नीटपणे करण्यात अडथळा येतो, यावर आपला विश्वास बसत नाही, असेही कर्मा यांनी म्हटले.

कर्मा याची आक्षपार्ह  ट्विट   अशी होती :

  • या देशाचे सर्वोच्च न्यायालय हा या देशातील सर्वोच्च विनोद आहे.
  • ‘राष्ट्रहिता’च्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालय ज्या वेगाने काम करताना दिसते ते पाहता तेथे महात्मा गांधींच्या ऐवजी हरीश साळवे यांचा फोटो लावण्याची वेळ आली आहे.
  • (न्यायमूर्ती) धनंजय चंद्रचूड हे इतरांना मागे ठेवून घाईघाईने विमानात बसविलेल्या ‘फर्स्ट क्लास’ प्रवाशांना शॅप्पेन सर्व्ह करणारे ‘प्लाईट अ‍ॅटेन्डंट’ आहे. सामान्य प्रवाशांना मात्र, शॅम्पेन तर सोडाच; पण निदान विमानात तरी घेतले जाईल की नाही याविषयी खात्री नाही.
  • ज्यांच्या पाठीचा कणा अजूनही शाबूत आहे अशा वकिलांनी सर्वोच्च न्यायालय किंवा तेथील न्यायाधीशांचा उल्लेख ‘सन्माननीय’ असा करणे बंद करावे. त्या इमारतीमधून सन्मान कधीच हद्दपार झाला आहे.

याखेरीज कर्मा यांनी भगव्या रंगाची पार्श्वभूमी असलेले व राष्ट्रध्वजाऐवजी ‘भाजपा’चा झेंडा फडकत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे ‘मॉर्फ्ड’ चित्रही समाजमाध्यमांत टाकले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER