शिवभोजन थाळीची संकल्पना यशस्वी ; 2 कोटी लोकांनी घेतला आस्वाद

Chhagan Bhujbal - Shiv Bhojan Thali

मुंबई : गोरगरीबांवर उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी राजशासनाने शिवभोजन (Shiv Bhojan) योजना सुरु केली. जानेवारीमध्ये ही योजना सुरू झाली. त्यातच मग मार्चपासून देशात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोना (Corona) संकटामुळे लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला. त्यामुळे अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. त्यामुळे शिवभोजन केवळ ५ रुपयांत उपलब्ध करुन दिले. राज्यात २६ जानेवारी ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

२६ जानेवारी २०२० रोजी शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला होता. रोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याच्या निर्णयास मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ४४ हजार ४०, ३० लाख ९६ हजार २३२ लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER