काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार – शिवराजसिंह चव्हाण 

Rahul gandhi

नागपूर : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले. तर दुसरीकडे ७० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला घरी बसवले. यामागे मुख्य कारण म्हणजे, काँग्रेसला नेहरू गांधी परिवाराने स्वतःचा पक्ष म्हणून चालवले, परिवाराव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेत्याला पक्षाची जबाबदारी सोपवणे या कुटुंबाला जमले नाही. पक्षातील नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांना गुलाम बनवून ठेवले. त्यांच्या एकाधिकारशाहीमुळेच काँग्रेसचे पतन होत चालले आहे. असे मत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय संयोजक शिवराजसिंह चव्हाण यांनी आज नागपुरात व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर भाजपच्या वतीने संपूर्ण देशभरात चव्हाण यांच्या नेतृत्वात सदस्यता अभियान राबवले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुर जिल्ह्यातील नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस मोठ्या संकटात सापडला आहे. पराभवाची जबाबदारी घेण्यास कुठलाही नेता पुढे आला नाही. त्यामुळे शेवटी पक्षाच्या अध्यक्षाला आपला राजीनामा द्यावा लागला. ज्या पक्षाने देशात ७० वर्ष राज्य केले त्या पक्षाला अध्यक्ष मिळत नसल्याने काँग्रेस मोठ्या विचित्र परिस्थितीतून जात आहे. काँग्रेस विसर्जित करण्याचं महात्मा गांधींचं स्वप्न राहुल गांधी पूर्ण करणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

पक्षाचं नेतृत्व करायला कोणीही तयार नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे नेहरू गांधी परिवाराची एकाधिकारशाही. पक्षाचा अध्यक्ष कोणीही झाला तर त्याची अवस्था माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांच्यासारखी व्हायला उशीर लागणार नाही हे सर्व नेत्यांना माहिती आहे. आई आणि मुलगा हेच काँग्रेसला चालवतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोणीही अध्यक्ष बनायला तयार नाही. असेही ते म्हणाले. खरे पाहता पराभव झाल्यानंतर नेतृत्वाने पक्षाला सावरण्यासाठी खंबीरपणे उभे राहायला हवे मात्र, मात्र काँग्रेसमध्ये कप्तानानेच पळपुटेपणा केल्याने पक्षातील नेते मोठ्या विचारात पडले आहे. त्यामुळे भाजपात त्यांचे इनकमिंग सुरु आहे असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कर्नाटकाच्या राजकीय नाट्यावरही भाष्य केलं. कर्नाटकमध्ये सत्तेत आलेले काँग्रेस-जेडीएसचे सरकार सुरवातीपासूनच अस्थिर आहे. त्यांची विचारांची आघाडी नसून केवळ सत्तेसाठी असल्याचे वेळोवेळी दिसून आले. आता कुमारस्वामींनी राजीनामा द्यावा आणि कॉग्रेसच्या जाळ्यातून मुक्त व्हावे असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सदस्यता अभियानाबाबत माहिती देतांना चव्हाण यांनी सांगितले की, संपूर्ण देश भाजपमय करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यासाठी पक्षविस्तार करणे गरजेचे आहे. आम्ही दुसऱ्यांदा निवडून आलेलो असलो तरी, गप्प बसणार नाही. पक्षविस्तारावर आमचा भर राहणार असून, सदस्यता अभियान हा त्याचाच एक भाग आहे. हे अभियान राष्ट्रीय पुनर्गठन अभियान आहे. देशाच्या विकासामध्ये जनतेला जोडण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. महाराष्ट्रात एकूण १८ हजार शक्तिकेंद्र असून, जनसंपर्क वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मिलिंद माने, अनिल सोले, शहराध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, मीडिया प्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते.