कमी दाबाच्या पट्ट्याने थंडी झाली गायब

Heavy Rain Yellow Alert

मुंबई :  मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक या भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर या भागांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून ६ ते ८ जानेवारीपर्यंत राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  राज्यभर ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे असतात. मात्र यंदा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चार वादळे आली. तसेच वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने वरचेवर पाऊस पडत आहे. तीन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा मध्यबिंदू मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक भागावर आहे. त्यामुळे मागील २४ तासांत  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.

मराठवाड्यात बीड, लातूर, उस्मानाबाद तर विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागांतही ७ व ८ जानेवारी रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारतात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशातील ३२ राज्यांत पाऊस पडत आहे. यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व दक्षिण भारतात तमिळनाडू, कर्नाटक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तर व दक्षिण भारतात पाऊस पडत असल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER