मुस्लिम आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी -विधान परिषदेचे प्रविण दरेकर यांची मागणी

Pravin Darekar-CM Thackeray

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना जो किमान समान कार्यक्रम ठरला होता त्यामध्ये मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतील भूमिका आज अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उत्तरातून अखेर समोर आली आहे, त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लिम आरक्षणाला शिवसनेने मान्यता दिली आहे, हे आता स्पष्ट झाले असून आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता राज्याच्या जनतेसमोर शिवेसनेची भूमिका स्पष्ट करावी असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केले.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरामध्ये अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या उत्तरातून मुस्लिम आरक्षणा संदर्भात सरकारची भूमिका समोर आली आहे. त्यामुळे किमान सामान कार्यक्रमातील मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेने मान्यता दिली असावी असा टोला मारतानाच प्रविण दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सरकारची बाजू मांडली. त्यावेळी मंत्री मलिक यांनी या मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचाही पाठिंबा आहे, तसेच शिवसेनेच्या आमदारांचाही मुस्लिम आरक्षणाला विरोध नसून पाठिंबा आहे असे मंत्री नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट केले, त्यामुळे शिवसेना व शिवसेनेचे आमदार मुस्लिम आरक्षणाच्या बाजूला असल्याचे स्पष्ट चित्र सभागृहात दिसून आले.

आघाडी सरकारडून मुस्लिम समाजासाठी गुड न्यूज, मुस्लीम आरक्षणासाठी कायदा करणार!

राज्याच्या मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका हीच असल्याबाबत मलिक यांना विचारले असता त्यांनी ते मान्य कले. तसेच सभागृहात उपस्थित आदित्य ठाकरे यांनीही होकारार्थी मान डोलावून मंत्री मलिक यांच्या भूमिकेला दुजोराच दिला आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमातील मुस्लिम आरक्षणाच्या बाजुची शिवसेनेची भूमिका आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनते समोर आल्याचे दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना निर्दशनास आणून दिले.

मुस्लिम समाजाच्या मतांसाठी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा नवाब मलिक काढत आहेत. हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा तसा आदेश आहे. त्यामुळे हा फक्त मुस्लिमांचं लांगूलचालन करण्यासाठी प्रयत्न असल्याची टीकाही दरेकर यांनी केली

राज्यातील कोणत्याही उपेक्षित समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु, उपेक्षित समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीर करवे. मुस्लिम किंवा कुठलाही समाज असो आम्ही त्या समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करवी असे ठाम मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

आंध्रप्रदेश मध्ये आरक्षणाच्या मागणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे आरक्षण नाकारले आहे. शिवसेनेच्या आमदारांचा मुस्लिम आरक्षणाला पाठींबा असेल तर चांगली बाब आहे. परंतु या आरक्षाणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक असल्याचे मत यांनी व्यक्त केले.