शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी थांबला मुख्यमंत्र्यांचा ताफा

CM Uddhav Thackeray - Chandrapur

चंद्रपूर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरमधील (Chandrapur) घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर ते निघाले होते. त्यांना रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त उभे दिसले. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

उद्धव ठाकरे यांनी सकाळी गोसेखुर्द व चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती. कालव्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या बाजूला शेतकरी-प्रकल्पग्रस्तांची गर्दी पाहून ठाकरे यांनी गाडी थांबवली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. ३५ वर्षे झाले तरी शेतीला पाणी मिळत नाही, अशी तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारले व कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात विदर्भापासून केली आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘प्रकल्प पूर्ण करतानाच या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गोसेखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाहणीनंतर आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER