मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री म्हणजे मी – संभाजी पाटील निलंगेकर

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात लाडका मंत्री कोण अशी विचारणा झाली तर संभाजी पाटील निलंगेकरांचं नाव समोर येत, असं स्वतः निलंगेकर यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.

निलंगेकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आवडत्या आणि ना आवडत्या अशा मंत्र्यांची यादी तयार केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर नांदेड महापालिकेची टाकलेली जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडू, असा विश्वासही निलंगेकर यांनी यावेळी दिला.

तसेच यावेळी संभाजी निलंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जाहीर भाषणात ‘रावण’ असा उल्लेख केला. त्यामुळे जाहीर सभेत भाजप मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य हे नेहमीचंच झालं आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत सहभागी आहे. एकत्र सत्तेत असतानाही दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यास मागे पुढे पाहत नाही. मात्र या सभेत शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश करून दिला. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली. शिवाय नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.