कांदा प्रश्नावर उद्या मुख्यमंत्री केंद्र सरकारशी बोलणार; पवारही म्हणाले होते राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा ठेवू नका

Onion & Uddhav Thackeray

मुंबई : राज्याचे आर्थिक गणित कोलमडले की, पहिले झड पोहचते ती कांद्याला. या कांद्याने अनेकांना आजवर रडवून सोडले आहे. त्यातच आता कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी आणि साठवणूक क्षमतेवर मर्यादा घातल्यानंतर राज्यभर कांदा प्रश्न तापला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (29 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत कृषीमंत्री दादा भुसेदेखील उपस्थित होते (Onion growers meet CM Uddhav Thackeray).

बैठकीनंतर दादा भुसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्या कांदा उत्पादकांसंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहेत”, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

तर, कांदा उत्पादकांनीही यावर ठोस भूमिका मांडली आहे. आम्हाला निर्णय लवकर पाहीजे. आमचा कांदा लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी घेतला पाहीजे”, अशी भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली. तसेच, आम्ही काय अंमली पदार्थ विकतो का असा संतप्त प्रश्नही कांदा उत्पादकांनी उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, आमच्या मनात संतापाची भावना आहे. यावेळीसुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्याचं खूप मोठ नुकसान होत आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या बैठका होतात. तरी तोडगा का निघत नाही? दिवाळीचा सन तोंडावर आला असताना आम्ही करायचं काय? असा प्रश्न केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल (28 ऑक्टोबर) नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कांदा प्रश्नावर भूमिका मांडली होती. कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं शरद पवार म्हणाले होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER