मुख्यमंत्री दोन दिवसात कोकणाला मोठी मदत करणार – संजय राऊत

Sanjay Raut-Uddhav Thackeray

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) जोरदार तडाखा कोकणाला बसला आहे. त्यातही सिंधुदुर्ग आणि त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी दौरा करून मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचे आश्वासन दिले. पंचनामे होताच मदत जाहीर करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असले तरी, मागच्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’चा (Nisarg) अनुभव पाहता मदत नेमकी कधी हातात पडणार असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. केवळ तीन तासांच्या दौऱ्यात काय साध्य होणार असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे. विरोधकांच्या या सर्व प्रश्नांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी कालच कोकणातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे. केवळ तीन तासांच्या दौऱ्याने काय साध्य होणार असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. मात्र त्यांना सांगू इच्छितो कोकणाचे आणि शिवसेनेचे नाते कोणीही ओळखू शकलेले नाही. कोकणाने शिवसेनेला भरपूर काही दिले आहे. आता मुख्यंमत्री त्याची मोठी परतफेड दोन दिवसात करणार आहे. कोकणावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी मुख्यमंत्री घेतील. मदतीबाबत विरोधकांनी आश्वस्त राहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

यावेळी राऊत यांनी विधान परिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नामनियुक्त सदस्यांबाबत हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाबाबतही भाष्य केले. राज्य सरकारने १ वर्षपूर्वीच १२ नावांची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. मात्र त्यांना फाईल बघायलाही वेळ नाही. सदस्यांची वेळेवर नियुक्ती व्हायला हवी, मात्र राज्यपालांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हा राज्यघटनेचा भंगच आहे. महाविकास आघाडी सरकारने याबाबत राज्यपालांना अनेकदा विचारले. पण कुठलंही उत्तर मिळाले नव्हते. आता कोर्टानेच विचारणा केली आहे. आताही वेळ गेलेली नाही. राज्यपालांनी शिफारस केलेल्या नावांची तात्काळ नियुक्ती करावी, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘देण्यापेक्षा मागणं हाच या ठाकरे सरकारचा बाणा झालाय’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button