मुख्यमंत्र्यांना छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची काळजी, पाच किल्ल्यांबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Today

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chhatrapati Shivaji Maharaj) काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी लक्ष घातले आहे. ऐतिहासिक असेलेले गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र हे काम करतांना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या परिसरात सुविधा निर्माण कराव्यात. तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांची निवड…

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणारे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत यापैकी पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांची निवड करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासकीय तसेच इतर तज्ज्ञ लोकांचा सहभाग असलेली, दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करा तसेच निवडलेल्या प्रत्येक किल्ल्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करून याच पाच ही किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षामार्फत सनियंत्रण करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

गडकिल्ल्यांच्या पावित्र्याला अजिबात धक्का नको…

शिवाजी महाराजांचे एकेकाळचे सोबती, स्वराज्याचे सैनिक असलेल्या गडकिल्ल्यांनी महाराजांचा पराक्रम पाहिला, त्या पराक्रमाचे ते साक्षीदार झाले. त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून हे काम करतांना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले

गावात पर्यटनकेंद्र उभारावे, जैवविविधता जोपासावी…

या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या ५० कि.मी अंतरामध्ये असलेली पर्यटनस्थळे, किल्ल्याचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम तिथले वन्यजीव, तिथली वनसंपदा,जैव विविधता जोपासावी. आजूबाजूची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील तर त्या, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटनकेंद्र विकसित करता येईल का, तिथे मुळ गड कसा होता याची प्रतिकृती तयार करता येईल का, पूर्वीचे ते ऐतिहासिक वातावरण निर्माण करता येईल का, लाईट ॲड साऊंड शो दाखवता येईल का, यादृष्टीने विचार करून एक सर्वंकष विकास आराखडा या समित्यांनी सादर करावा असेही म्हटले.

किल्ल्यांच्या संवर्धनातील अडथळे दूर करा…

राज्यातील सर्व किल्ले एका शासकीय विभागांतर्गत आणून त्यांच्या विकासात असलेले अडथळे ताबडतोब दूर करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की गडकिल्ल्यांवरची स्वच्छता खूप महत्वाची आहे. गड किल्ल्यांचा विकास करताना त्याचे ऐतिहासिक संदर्भ जपले जाणे, इथे करावयाची डागडुजी ही पुरातत्व खात्याच्या निकषाप्रमाणे होणे गरेजेच आहे. रायगडावर ज्याप्रमाणे पर्यटकांसाठी रोप वे उपलब्ध करून देण्यात आला आहे तो इतर काही गडकिल्ल्यांवर उपलब्ध करून देता येईल का याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी तपासून पाहण्यास सांगितली.

स्थानिकांना रोजगार संधीही मिळावी…

पावसाळ्यात आपण मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतो परंतू गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बिया टाकल्या तर नैसर्गिकरित्या या भागात वनराई विकसित होण्यास मदत होईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व कामात स्थानिकांना विश्वासात घेऊन काम केल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पर्यटकांच्या राहण्याच्या, जेवण्याच्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मिळतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेले प्रयत्न, पर्यटन वाढीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.

बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, यांच्यासह अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, ऋषीकेश यादव, भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकारी श्रीमती नंदिनी भट्टाचार्य, महाराष्ट्र पुरातत्व खात्याचे अधिकारी, महाराष्ट्रातील गिरीप्रेम क्लबचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button