मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबचे खरे रूपही लोकांसमोर आणले – शिवसेना

Arnab Goswami-CM Thackeray

मुंबई : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता (Partha Dasgupta) यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यावरूनच शिवसेनेने आता पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. राज्यांतील नेतृत्व हिमतीचे व खमके असेल तर भाजपचे केंद्रातील नेते काहीच करू शकत नाहीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचा खमकेपणा सिद्ध केलाच, पण अर्णबसारख्या भुताटकीचे खरे रूपही लोकांसमोर आणले. आता ‘अर्णब’चा आणि आपला काही संबंध नसल्याचे भाजप पुढारी सांगत आहेत. हा पळपुटेपणा आहे. मुंबई पोलिसांना माफिया वगैरे म्हणणारे स्वतः मात्र नीतिमत्तेचा बुरखा पांघरून एक प्रकारे देशाशी गद्दारीच करीत होते व या गद्दारांच्या समर्थनासाठी भाजपवाले रस्त्यावर उतरले होते. आता त्याच गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले आहे. मराठीत एक म्हण आहे ‘केले तुका आणि झाले माका’. गोस्वामीच्या बाबतीत नेमके तेच घडले आहे, असा खोचक टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

आजचा सामना संपादकीय…

तरुण मराठी उद्योजक अन्वय नाईक यांचा अर्णब गोस्वामी याने मानसिक छळ केला. नाईक यांनी गोस्वामीचा स्टुडिओ उभारून दिला, त्याचे पैसे अर्णबने बुडविले. त्या मानसिक तणावाखाली नाईक यांनी आत्महत्या केली. हे सर्व प्रकरण त्यावेळच्या भाजप सरकारने दाबले, पण ‘ठाकरे सरकार’ने नाईक कुटुंबाच्या मागणीवरून या आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आणि गोस्वामी महाशयांना बेड्या पडल्या. गोस्वामीला पाठिंबा देण्यासाठी तेव्हा ‘भाजप’चे लोक रस्त्यांवर उतरले होते. महाराष्ट्रातील भाजपने तर ‘छाती पिटो’ आंदोलन रस्त्यावर उतरून केले. कोणी छाती पिटत होते, कोणी धाय मोकलून रडत होते, कोणी स्वतःचे मुंडण करून घेतले होते. कारण त्यांच्या दृष्टीने महान ठरलेल्या अर्णब गोस्वामीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. उद्योजक अन्वय नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी ही अटक होती. गोस्वामीची अटक म्हणजे महाराष्ट्रात आणीबाणीच लागू झाल्याची प्रतिक्रिया तेव्हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली होती, पण आता अर्णब गोस्वामी याचे जे ‘व्हॉट्सऍप चॅट’ उघड झाले आहे, त्यानुसार गोस्वामी याने केंद्रीय मंत्री जावडेकर यांचा उल्लेख ‘यूसलेस’ म्हणत निष्क्रिय, बिनकामाचे म्हणून केला आहे, असा उपरोधिक टोलाही शिवसेनेने लगावला.

जावडेकरांच्या जागी स्मृती इराणीस आणता येईल काय, याबाबत त्यांनी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्तांशी चर्चा केली आहे. म्हणजे केंद्रात कोणी काय काम करायचे हे मोदी किंवा शहा (एनएम आणि एएस) ठरवत नाहीत, तर हे गोस्वामी महाशय ठरवत होते. त्याची वृत्तवाहिनी म्हणजे भाजपचे अधिकृत ‘मुख स्पीकर’ होते व गोस्वामी त्या वृत्तवाहिनीवर बसून जे काही उटपटांग उद्योग करीत होता, ते पत्रकारितेच्या कोणत्याच नीतिनियमात बसत नव्हते. भाजपास जे हवे तेच करायचे किंवा त्यांच्याच इशाऱयावर एखाद्यावर भुंकत राहायचे हाच धंदा होता. आपणच पहिल्या क्रमांकाचे ‘चॅनल’वाले आहोत, असे तो कोकलून सांगत असे, पण आता जो टीआरपी घोटाळा समोर आला त्याचा शिल्पकार, शिलेदार गोस्वामीच आहे. ‘बार्क’, ‘हंस’सारख्या संस्था, त्यांचे अधिकारी खिशात घालून बनावट टीआरपी निर्माण करणाऱया गोस्वामी टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला. त्याबद्दल मुंबई पोलिसांना लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारच द्यायला हवा. मुंबई पोलिसांनी फक्त टीआरपी घोटाळय़ातील गोस्वामी टोळीचा सहभाग उघड केला नाही तर देशाचे संरक्षण तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबत या टोळीने चालवलेले खेळही उघडे केले आहेत. संरक्षण खात्यातील गुपिते चोरणाऱयांना देशद्रोही ठरवून त्यांचे कोर्टमार्शल केले जाते. गोस्वामी टोळीने संरक्षण खात्यातील गुपिते चोरून चव्हाटय़ावर आणली हा देशद्रोहच आहे व देशद्रोह्यांवर कारवाई करणे म्हणजे आणीबाणी आहे, असे भाजपसारख्या संघवादी लोकांना वाटत असेल तर त्यांच्या राष्ट्रवादाची व्याख्या तपासून पाहावी लागेल. गोस्वामी याला जेलची हवा खाण्यासाठी हे एवढे पुरावे भरपूर आहेत, असे प्रशांत भूषण यांच्यासारख्या वकिलांनी स्पष्ट केले आहे, पण लष्कराची गुपिते उघड केल्याच्या आरोपाखाली केंद्र सरकार या माणसाला तुरुंगात पाठविणार आहे काय? कारण अनेकदा असे दिसले की, भाजपच्या या खास अंगवस्त्रास कायद्याचा बडगा बसू नये म्हणून बरीच धडपड मधल्या काळात झाली. तो सर्व प्रकार धक्कादायकच होता. म्हणजे गोस्वामी याच्यावर कारवाई होऊ नये, असेच आदेश आपले कोर्ट वारंवार देत राहिले. त्या कोर्टासही आता गोस्वामीच्या कारनाम्याने भोवळ आली असेल.

पुलवामात 40 जवान शहीद झाले. या दुःखात सारा देश असताना गोस्वामीला त्याचा टीआरपी वाढल्याचा आनंद झाला होता. पुन्हा बालाकोटवर हल्ला होत असल्याची माहिती या महाशयाने संरक्षण खात्याकडून आधीच फोडली होती. असे एकापेक्षा एक भयंकर अपराध गोस्वामी टोळीने केले आहेत. मुंबई पोलिसांनी 500 पानांचे ‘चॅट’ मिळविले. त्यात अशा अनेक प्रकरणांचा उलगडा झाला आहे. अर्णब गोस्वामीचे टी.व्ही. चॅनेल भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन विरोधकांवर तुटून पडत असे. तोंडाला उकिरड्यावरचे कुत्रे बांधावे असे ते भुंकत असे. सुशांत प्रकरण असेल नाहीतर कंगना, ईडीचा विषय असेल नाहीतर पालघरचे साधू हत्याकांड, एकतर्फी भुंकणे हाच त्याचा धंदा होऊन बसला होता. हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद म्हणजे फक्त ‘मी’ असे त्याचे धोरण होते. या माणसाने पत्रकारितेचे सर्व नीतिनियम पायदळीच तुडवले. कारण त्याला ‘वर’चा आशीर्वाद होता. अर्णबच्या ‘चॅट’मध्ये ‘एएस’ व ‘एनएम’ यांचा उल्लेख आहे, तो पुरेसा आहे, पण मुंबई पोलिसांनी त्याची गर्दन पकडल्यावर सगळेच थंड पडले, पळापळ झाली. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असा इशाराही शिवसेनेने भाजपला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची चौकशी करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER