
- प्रायश्चित्त घेणार का?
अहमदनगर : ज्याची तुम्ही सभागृहात ‘लादेन आहे का?’ असा प्रश्न विचारत पाठराखण केली तो सचिन वाझे आज आरोपी सिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभागृह आणि महाराष्ट्राची दिशाभूल केली. मुख्यमंत्री याचे प्रायश्चित्त घेणार का? असा प्रश्न भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका करताना ते म्हणालेत, आघाडीचा समान विकास कार्यक्रम नाही तर ‘समान लुटी’चा कार्यक्रम सुरू आहे. वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे. न्यायाधीशांच्या समीतीकडून प्रकरणाची चौकशी करा. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्या अशी मागणी करून त्यांनी प्रश्न केला – सेवानियमाचा भंग करणारे परमबीर सिंह यांना निलंबित का केलं नाही?
… अतिशहाण्या सल्लागारांचा सल्ला तरी ऐका !
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे गंभीर आरोप झाले आहेत. आम्हाला शहाणपण शिकवणाऱ्या अतिशहाण्या सल्लागारांचा तरी मुख्यमंत्र्यांनी आता सल्ला ऐकावा, अशी टीका संजय राऊत यांचे नाव न घेता विखे पाटील यांनी केली.
… तुमचे मंत्रीही तुमची जबाबदारी
‘मी जबाबदार’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तुमचे मंत्रीही तुमची जबाबदारी आहे, हे विसरू नये. मंत्र्यावर कारवाई केली नाही तर उद्या संशयाचे भूत तुमच्यापर्यंत येईल, असा इशारा विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याना दिला. हे प्रकरण केवळ अनिल देशमुखांपर्यंत मर्यादित नाही. सरकारमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक खात्यात भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले होते …
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या, मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचे आणि चारित्र्यहनन करायचे, हे आम्ही सहन करणार नाही. एवढे झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे, असे चित्र निर्माण केले जाते आहे. जो सापडेल त्याला दया – माया दाखवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते, याची आठवण राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला