नरभक्षक वाघाला पकडणाऱ्या पथकाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

CM Uddhav Thackeray

चंद्रपूर : जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघाला आज दुपारी वन विभागाच्या पथकाने पकडले. वाघाला पकडणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कौतुक केले.

गेल्या काही महिन्यात या आरटी -१ वाघाने आठ जणांचा बळी घेतला होता. तिघांना जखमी केले होते. तो दोनच दिवसांपूर्वी पिंजरा तोडून पळाला होता. आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

हा वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षकांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिले होते. तेंव्हापासून वन विभागाची पथके या वाघाच्या मागावर होती. तो हुलकावण्या देत होता. त्याला पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके, १४ गावातील ३५ स्वयंसेवक यांच्यासह ४ पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तो सापळ्यात अडकता-अडकता पिंजरा तोडून पळाला होता!

त्याला पुन्हा पकडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात तो अडकला. त्याला पशूवैद्यकीय पथकाने बेशुद्ध केले. नरभक्षक वाघ पकडला गेल्याने परिसरातील गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER