मुख्यमंत्री आले, फक्त हात दाखवून गेले…

Uddhav Thackeray & Aaditya Thackeray

Shailendra Paranjapeअखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुण्यात करोना (Corona) काळात आले. त्यांनी आढावा घेतला, लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाऊस पाडत अनेक मागण्या केल्या. विशेष म्हणजे कॉँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी या सरकारमधल्या सहभागी पक्षांच्या आमदारांनीही तक्रारींचा पाढा वाचला. दरमहा पाचशे करोना मृत्यूंची पुण्यमधे नोंदच केली जात नाही, असा खळबळजनक आरोप करून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय.

सर्व आमदारांनी अनेक तक्रारी करूनही ना त्याबद्दल ठोस कारवाईची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ना महापालिकेला वा पुणे जिल्ह्याला कोविड १९ला तोंड देण्यासाठी, जम्बो रुग्णालयांसाठी निधीची घोषणा केली. त्यांनी केवळ राज्य सरकार वैद्यकीय सुविधांसाठी जास्तीची मदत देईल, इतकंच सांगितलं. विशेष म्हणजे त्यांनी लोकप्रतिनिधींना सांगितलं की तुम्ही शासन आणि लोकांच्यातला दुवा व्हा. म्हणजे गेल्या तीन चार महिन्यात ज्या अडचणी येताहेत, त्यांचा पाढाच सर्व पक्षांच्या आमदारांनी मांडला तरीही मुख्यमंत्री त्यांना इतकंच सांगून गेले की लोक आणि शासन यांच्यातला दुवा तुम्ही व्हा.

पुण्यात आठपैकी सहा आमदार भाजपाचे आणि पुणे महापालिकेवर सत्ता भारतीय जनता पक्षाची. त्यामुळं पुण्यातल्या कोथरूडचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाढते रुग्ण लक्षात घेता, पुण्यात वैद्यकीय सुविधा वाढवल्या पाहिजेत, बेड, व्हेंटिलेटर वाढले पाहिजेत या मागण्या केल्या.  प्रशासन तीन जम्बो रुग्णालये बांधणार त्याला वेळ जाईल. त्यामुळे आहे त्या हॉस्पिटलमध्ये बेड वाढवले पाहिजेत ही मागणी त्यांनी मांडली. त्याशिवाय त्यांनी लेखी मागण्या करून पीपीइ किट, औषधे इतर साहित्य सरकारी दराने खाजगी रुग्णालयाला द्यावे, त्यामुळे रुग्णाला बिल कमी येईल, असंही सुचवलंय.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुचवलं की महापालिका जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारला पैसे देईल आणि सरकारनेही महापालिकेच्या पाठीशी उभे राहावे. त्यांनी खाजगी हॉस्पिटलनी सरकारी आदेशानंतरही बेड ताब्यात दिलेले नाहीत, याकडे लक्ष वेधून त्यांना कडक आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी केली. तसंच ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची कमतरता आहे आण त्यासाठी शासनाने महापालिकेलाही आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना (Shivsena) आमदार नीलम गोऱ्हे तसंच भाजपा (BJP) आमदार भीमराव तापकीर, महेश लांडगे, राहूल कुल, राष्ट्रवादीचे अशोक पवार, अतुल बेनके, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, कॉँग्रेसचे संग्राम थोपटे, शरद रणपिसे यांनी विविध स्वरूपाच्या तक्रारी केल्या आणि काही सूचनाही केल्या.

खाजगी रुग्णालयात 7 ते 8 लाख रुपये मोजावे लागतात, वाघोली सारख्या शहराला स्वतंत्र आरोग्य व्यवस्था द्यायला पाहिजे, अनेक कंपन्यांनी सीएसआर निधी खर्च केला नाही, आमदार निधीतून रुग्णवाहिका खरेदीची परवानगी द्यावी, खाजगी हॉस्पिटलसाठी जे अधिकारी नेमले त्यांचे मोबाईल नंबर जनतेला द्यावेत, प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स,नर्सेस नाहीत, अनेक ठिकाणी रुग्णालयात सुविधांसाठी जास्ती पैसे भरावे लागतात, या गोष्टी सर्व पक्षांच्या आमदारांनी बैठकीत मांडल्या. पालकमंत्री अजित पवार हेही बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री आले, त्यांनी पाहिले आणि ते गाडीतून हात हलवत गेले, इतकंच त्यांच्या पुण्याच्या बैठकीबद्दल सांगता येईल. त्यांनी हात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बघून हलवला पण तो हात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा केवळ हात हवेत गाडीबाहेर येऊन आशीर्वाद देणारा नव्हता. म्हणजे बाळासाहेबांच्या हातासारखा काळजी करू नका, मी आहे, असं आश्वस्त करणारा नक्कीच नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER