कोल्हापुरात बोगस पासचे आव्हान

Kolhapur - Bogus Pass

कोल्हापूर :- प्रत्येक व्यक्तीमागे दोन ते पाच हजार रुपये घेऊन बनावट पासद्वारे रेडझोन मधील व्यक्ती शहरात प्रवेश करत आहेत. मुंबईहून बोगस पास तयार करून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहेत. हे पास तयार करुन देणाऱ्या यंत्रणेचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. बोगस पास हे प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरत आहे.

२१ मे रोजी मुंबईहून जिल्ह्यात बोगस पास घेऊन बसमधील नऊ आणि कारमधील पाच प्रवाशांना किणी टोल नाक्यावर पकडले. बसमधील प्रवाशांची रवानगी पुन्हा मुंबईकडे करण्यात आली. तर कारमधील प्रवाशांना सीपीआरमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर वडगाव पोलिस ठाण्यात बोगस पास देणारा प्रशांत ( पूर्ण नाव नाही, रा. नालासोपारा, मुंबई) आणि चालक खुशीद महमंद जान (वय ५६ रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पास देणाऱ्या टोळीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र ही टोळी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहेत. शहरात दिवसभरात दोन हजारांहून वाहने प्रवेश करत आहेत. तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची संख्या एक हजारांच्या घरात आहेत. मुंबई आणि पुणे या रेडझोनमधून येणाऱ्या कुटुबांची संख्या अधिक आहे. चोरट्या मार्गाने प्रवेश रोखण्यासाठी पोलिसांनी किणी टोल नाक्याजवळील नदीवर टोल नाका उभा केला. मात्र त्या ठिकाणी बोगस पास देऊन शहरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

प्रवास करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाइन पास घ्यावा लागतो. ऑनलाइन परवानगीपूर्वी वैद्यकीय तपासणी, येणाऱ्या व्यक्तिची संख्या, ठिकाण, वाहनाची माहिती, चालकाची माहिती ही सर्व माहिती विचारात घेतली जाते. ही महिती संबधित जिल्ह्याच्या यंत्रणेकडून तपासणी करुन इ-पास दिला जातो. चेक पोस्ट नाक्यावर ऑनलाइन इ-पासची फेरतपासणी करुनच प्रवेश दिला जातो. मात्र या पासमध्ये फेरफार करुन शहरात प्रवेश मिळविण्याचे प्रकार वाढले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER