केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतक-यांसोबत, सर्वतोपरी मदत करणार; मोदींचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

CM Thackeray-Narendra Modi

मुंबई : परतीच्या पावसानं राज्यातील शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. उभ्या पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी धायमोकलून रडत आहे. आधीच कोरोनाची (Corona) स्थिती, लॉकडाऊन (Lockdown) त्यात निसर्गाचा फटका यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोनवरुन संपर्क साधून महाराष्ट्राला मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंबंधित माहिती खुद्द नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करत दिली आहे.

नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रात (Maharashtra) झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER