केंद्राकडून जनतेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे – जयंत पाटील

jayant Patil

वाशिम : आज देशाची परिस्थिती फार वाईट झाली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची कुठलीही तयारी नाही. कामगारांचे कायदे रद्द केले जात आहेत. भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे. केंद्राकडून चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न जात आहेअसा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज दहावा दिवस आहे. यानिमित्ताने जयंत पाटील आज वाशिम जिल्हयात आहेत. यावेळी जयंत पाटील रिसोड येथे आढावा बैठकीदरम्यान बोलत होते.

पाटील यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहिलं राज्यकर्ते असे क्रुर कसे काय असू शकतात? असा प्रश्न मनात येतो. शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहेत असा भास होतो आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघांना राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जत्था नेहमीच तयार असायला हवा. देशातील सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करायला हवा, त्याचे नेतृत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, से आवाहनही त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्य सरकारने इंधनावर कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. मात्र केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या GST परतावा दिला नाही. आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फडणवीसांनी मोदींना सांगावं, ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं’, अशी टीका
पाटील यांनी केली.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER