सुशांत सिंगच्या बहिणींविरुद्ध वांद्रे येथे नोंदविलेला गुन्हा योग्य

मुंबई पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

Bombay High Court - Mumbai Police - Sushant Singh Rajput

मुंबई :बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने  दाखल केलेल्या फिर्यादीवरून फौजदारी गुन्हा घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने सुशांतच्या बहिणींविरुद्ध त्यासंदर्भात वांद्रे पोलिसांनी नोंदविलेला ‘एफआयआर’ योग्यच आहे, असे ठाम प्रतिपादन मुंबई  पोलिसांनी (Mumbai Police) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) केला आहे. हा ‘एफआयआर’ रद्द करावा यासाठी मीतू सिंग आणि प्रियंका सिंग या सुशांत सिंगच्या दोन बहिणींनी याचिका केली आहे.

त्यांच्या या मागणीस केंद्रीय गुप्तचर विभागानेही (CBI) समर्थन केले आहे. या याचिकेला उत्तर देण्यासाठी वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निखिल कापसे यांनी वरीलप्रमामे प्रतिपादन करणारे प्रतिज्ञापत्र केले आहे. सुशांत सिंगच्या वडिलांनी रियाविरुद्ध पाटणा येथे गुन्हा नोंदविला. त्याला काटशह देण्यासाठी मुंबईत हा गुन्हा नोंदविण्यात आला याचा इन्कार करताना कापसे म्हणतात की, मुंबईतील या ‘एफआयआर’चा पाटण्यात काय झाले याच्याशी काहीही संबंध नाही.

सुशांत सिंगची रीतसर वैद्यकीय तपासणी न करता त्याच्या बहिणींनी व डॉ. तरुण कुमार या त्यांच्या मित्राने सुशात सिंगला काही प्रतिबंधित औषधे घेण्याचा सल्ला देण्यामागे काही गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान आहे का, याचा तपास करण्यासाठी मुंबईतील हा ‘एफआयआर’ आहे. सुशांतची प्रकृती हळूहळू बिघडत जाऊन शेवटी त्याचा मृत्यू होण्याशी याचा काही संबंध आहे का, याचा शोध घेणे हा यामागचा हेतू होता. मुंबई पोलीस म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता त्या ‘एफआयआर’चा तपासही ‘सीबीआय’कडे वर्ग करण्यात आला आहे.

परंतु त्याआधी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही गैर आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलेले नसताना हा ‘एफआयआर’ नोंदविण्याच्या हेतूविषयी निष्कारण खोटे व बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. प्रतिज्ञापत्र म्हणते की, दाखल केल्या गेलेल्या फिर्यादीवरून दखलपात्र फौजदारी गुन्हा घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असेल तर संबंधित पोलीस  अधिकार्‍याने रीतसर गुन्हा नोंदविणे कायद्यानुसार क्रमप्राप्त आहे. त्यामुळे वांद्रे येथे नोंदलेला हा गुन्हा अकारण व तद्दन बेकायदा आहे, असे तर मुळीच म्हणता येणार नाही.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER