सुशांत सिंगच्या बहिणीविरुद्धचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडूनही कायम

Priyanka Singh - Supreme Court - Maharashtra Today

नवी दिल्ली : संशयास्पद मृत्यू झालेला बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या प्रियांका सिंग (Priyanka Singh) या बहिणीविरुद्ध सुशांत सिंगची एकेकाळची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) शुक्रवारी नकार दिला.

गुन्हगारी स्वरूपाचे कारस्थान रचून सुशांत सिंगला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले, या रिया चक्रवर्तीच्या फिर्यादीवरून मुंबई  पोलिसांनी प्रियांका सिंग व मीती सिंग या सुशांत सिंगच्या दोन बहिणी व दिल्लीच्या  राम मनोहर लोहिया  इस्पितळातील एक डॉक्टर डॉ. तरुण कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यापैकी फक्त मीतू सिंग हिच्याविरुद्धचा गुन्हा रद्द केला होता.

या निकालाविरुद्ध प्रियांका सिंग हिने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. ते सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. सुब्रह्मणियन यांच्या खंडपीठाने फेटाळले.

अखेरच्या काही दिवसांत सुशांत सिंग ‘डिप्रेशन’मध्ये होता तेव्हा डॉ. तरुण कुमार यांचा टेलिफोनवरून सल्ला घेऊन प्रियांका व मीतू या दोन बहिणींनी त्याला काही औषधे घ्यायला लावली. तिच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा रिया चक्रवर्तीच्या फिर्यादीचा सूर होता. मात्र यात मीतू सिंग हिचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने तिच्याविरुद्धचा गुन्हा रद्द केला होता.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER