मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी (My family, my responsibility) मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबांना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दुपारी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या असे सांगितले.

जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी २४ लाख कुटुंबांच्या भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयचे १५ हजार ३९२ रुग्ण तर कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेल्या २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या.

सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधा असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

ही मोहीम केवळ शासन राबवीत नसून लोकांची आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे या दृष्टीने जनजागृती करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनीदेखील सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER