अंतरीची साद माझी..!

Mansavad

हाय फ्रेंड्स ! पोषण मग ते शरीराचं असो की मनाचं , आरोग्य साठीची गरज पूर्ण करण्यासाठी पोषण हे आवश्यकच आहे. शरीराच्या पोषणाची आपण काळजीही करतो किंवा करतो आहोत अस आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात आपण खरी काळजी करत असतो आपल्या जीभेची. जिभेचे चोचले पुरवून शरीर बनत असंच वाटतं आपल्याला ! दुसरीकडे व्यायाम न करता आळस जोपासून आपण शरीराची काळजी करत नसतो, तर नसते लाड करत असतो. सतत गॅझेट्स हाताळत कानावर, डोळ्यावर अन्याय करतो. आणि लवकर न उठून बॉडी क्लॉक बिघडवतो. म्हणजेच काय तर सगळ्याच शरीर रचनेवर अन्याय आणि अत्याचार करून खरी जोपासना करतो ती चैनीची आणि सुखलोलुप्तेची .

शरीराचे पोषण हव असेल तर एकूणच दिनचर्या नियमित करून आहार, विहार, निद्रा यातील नियमितता आणि मर्यादा गरजेची असते. म्हणजे सगळं काही नियमित पण माफक प्रमाणात घ्यायचं. शरीर पोषणासाठी ज्या प्रकारे काही गरजा असतात. तशाच गरजा या मनाच्या पोषणासाठी ही आवश्यक असतात. मनाच्या गरजांबाबत मानसशास्त्रज्ञ मॅस्लो यांची गरजांची उतरंड खूप प्रसिद्ध आहे. यात पाच स्टेप्स दिल्या आहेत.

१) सगळ्यात पहिली म्हणजे शारीरिक गरजांची ज्यामध्ये अन्न,पाणी ,झोप ,लैंगिक गरज, श्वासोश्वास

२) दुसऱ्या पायरीवर सुरक्षितता मग ती शरीर ,नोकरी इतर संसाधने ,फॅमिली ,तब्येत संपत्ती या गोष्टी

३) तिसऱ्या पायरीवर प्रेम आणि जवळीकता आणि प्रशंसा,

४) चौथी पायरी असते ती स्व आदराची ! त्यामध्ये आत्मविश्वास ,अचीवमेंट ,आदर हे येतात.

५) सगळ्यात वरची, पायरी सेल्फ अॅक्च्युअलयझेशन. यात क्रिएटिव्हिटी , स्वीकार, स्वतःच्या अस्तित्वाविषयी अर्थपूर्णता, अनुभवांच्या हेतूंची जाणीव ! अशा विविध गोष्टींचा समावेश होतो.

थोडक्यात पाच पातळ्यांवर मानवी गरजांची विभागणी मॅस्लोने केली आहे. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक पातळीवरील पोषणासाठी या पातळ्यांना पार्श्वभूमीला ठेवुन आपण गरजांचा विचार करू. यादृष्टीने विचार करता प्राथमिकता देता येईल ती गरज म्हणजे” नीड टू लर्न माईंड बॉडी कनेक्शन.” म्हणजे मन आणि शरीर यांची एकरूपता साधता येणे. यांची एकरूपता साधण्यासाठी शरीराची हाक आणि मनाची साद ही दोन्हीही ओळखता यायला हवी. बरेचदा शरीर आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचवत असतं, सांगत असतं. पण आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तसंच मनाचही! ज्याला बरेच जण मनाचा कौल म्हणतात.असा आपला आतला आवाज आपल्याला काही गोष्टी सांगत असतो. त्याही गोष्टी कडे आपण चक्क कानाडोळा करतो.

पहिली गोष्ट शरिराचा आवाज .त्याचे काही सुचवणे ऐकता येणे. खरंतर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.परंतु याकडे दुर्लक्ष होण्याचं कारण म्हणजे आपलं मन बरेचदा बाह्य वातावरणाशीचं इतकं तद्रूप झालेलं असतं की माझा आपला आवाज मग तो माझ्या शरीराने दिलेला किंवा माझ्या मनाने दिलेला मला ऐकू येत नाही आणि आपण बाह्यकोलाहलात रमतो. उदाहरणार्थ बघा ,आपल्या गाडीचा हॉर्न कॉलनी च्या पहिल्या टर्न पासून आपण ओळखतो. आमच्या कॉलनीतील ४ वर्षाचा सर्वज्ञ सुद्धा काकांच्या गाडीचा आवाज बरोबर ओळखतो.

किंवा आमचा कुत्रा. तो वेगवेगळ्या वेळी इतके वेगवेगळे आवाज काढतो, म्हणजे तो का ओरडतो ते आम्हाला बरोबर कळतं. त्याला करमत नसल तर तो आम्हाला बोलावतो, सगळे जेवत असलो व त्याला काही दिलं नाही कि तो हळू आवाजात आमच्यावरही गुरगुरतो. घरातील लोक आपल्या आपल्या गाड्यांनी बाहेर गेले व आले ,तर तो ते सुख आणि दुःख वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून व्यक्त करतो. आणि त्याचे हे आवाज आम्हाला कळतात. थोडक्यात या कोलाहलाकडे आपण जितकं लक्ष देतो ,तेवढच आपल्या शरीराला मात्र गृहीत धरतो .त्याकडे चक्क दुर्लक्ष करतो. आज ज्या शरीराच्या भरवशावर आपण एवढ्या उड्या मारतो त्याच्याकडे दुर्लक्ष. ? खरंतर शरीरशास्त्र समजून घेतलं तर लक्षात येत की शरीर हे किती गुंतागुंतीचे यंत्र आहे .गाडी सर्विसिंग करणारे आपण स्वतःच्या शरीराला oiling करायचा कंटाळा करतो. बरेचदा लिखाण करताना माझा एक डोळा लाल होतो. पण “अं, त्यात काय मोठंसं ! त्याचा एवढा कशाला बाऊ करायचा ?”असे मी म्हणते.

बरेचदा आपण साधं क्रीम किंवा मॉइश्चरायझर हातांना, चेहऱ्याला लावताना फक्त फासतो, किती जण स्वतःच्या शरीरावर प्रेम करत मॉइश्चरायझर लावत असतील ? संख्या फार विरळ असावी. माझ्याकडील एका फंक्शनला माझी मोठी बहीण आली होती. नेहमी खूप उत्साही असते ती. पण त्यावेळी ती प्रचंड थकत होती. घाईगर्दीत ते ना मला लक्षात आलं ना तिलाही ! आणि नंतर लगेचच तिचा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. आपलं शरीर आपल्याला वॉर्न करतं . तू थकला किंवा थकली आहेस, तुला भूक लागली आहे, तुझी झोप पूर्ण झालेली नाही. आणि तरी आम्ही स्वतः ला ताणत रहातो,तुटेपर्यंत !

शरीरात कफ साठतो .त्याला प्रतिसाद म्हणून डोकं दुखू लागत, विषाणूंचा आक्रमण होतं म्हणून ताप येतो कारण शरीर त्याला प्रतिकार करत , आपल्याला सुचवत असत. की “समथिंग इज रॉंग ! “पण आपण पॅरासिटॅमॉल खाऊन कामाला लागतो .ताप उतरतो पण मूळ दुखणं कायम राहतं.

चिडचिड होत असते, कारण ॲडजस्टमेंट जमत नसते, किंवा हार्मोनल इनबॅलन्स झालेले असतात. पण त्यावर उपाय करत नाही.”बरं नाही असं सारखं चिडचिडत राहणं !”असं स्वतःला आणि इतरांना सुनावतो.मुळापर्यंत जातच नाही. मनाचा आतला आवाज ऐकत नाही.

बरेच जण म्हणतात, माझं मन सांगते एखादी कृती करायला ! बरेचदा आपला आतला आवाज आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवत असतो आणि बरेच जणांना असा अनुभव येतो त्या किती बरोबर असतात. पण आपल्या वर्कोहोलिक पणाने आपण हा आतला आवाज ऐकत नाही आणि नंतर हळहळण्याची वेळ येते. म्हणूनच आपला आतला आवाज, आपल्या मनाने आपल्यालाच घातलेली साद ऐकायला पाहिजे ,अंतर्मुख व्हायला पाहिजे, स्वतःमध्ये डोकावून बघायला पाहिजे .

शरीराच्या आणि मनाच्या पोषणासाठी जे योगशास्त्र सांगितले आहे,त्यातील योग हा शब्द युज या शब्दापासून बनला. यूज म्हणजे एकत्रित येणे. जेथे शरीर आणि मन एकत्र येते तो योग ! मन आणि शरीराचा समतोल जेव्हा होतो तेव्हा ध्याना कडे वाटचाल सुरू होते. आपण योगा करतो मात्र त्याचवेळी कुकरची शिट्टी का होत नाही ?दूध उतू जात नाही ?ना कुणाचा मेसेज आला, मग त्यावर मला ऑफिस मध्ये काय करायचे ? हे जर चालू असेल तर देव देवळात आणि चित्त खेटरात अशीच परिस्थिती होते. आणि मग कशाचा युज आणि काय ?

खरंतर योगा करताना त्या शारीरिक क्रिया श्वास उच्छवासांशी जोडल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला जातो. नामस्मरणही या मध्ये फार महत्त्वाचा भाग ठरते. श्री. वामनराव पै म्हणतात की “नामस्मरणाचे शास्त्र लोकांपुढे व्यवस्थित न मांडल्यामुळे नामस्मरणाचा महिमा लोकांना पटत नाही. अंतर्मन व बहिर्मन एक झाल्याशिवाय नामस्मरण होत नाही ही दोन्ही मते एकत्र आली की शांति उदयाला येते आणि तिचा फायदा होतो.”

फ्रेंड्स ! म्हणूनच प्रत्येकाने माझ्या अंतरीची साद मग ती मनाची असेल नाहीतर शरीराची ऐकायलाच हवी. कारण पण ती तुमची, माझी, प्रत्येकाची प्राथमिक गरज आहे.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER