
उदयपूर : अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी (Ram Mandir) विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल (Ashok Singhal) यांचे छोटे बंधू अरविंद सिंघल (Arvind Singhal) यांनी मंदिरासाठी ११ कोटी रुपये दान दिले आहे. हे राम मंदिरासाठी आतापर्यंतचे मिळालेले सर्वांत मोठे दान आहे. याबाबत अरविंद म्हणाले की, मोठ्या भावाचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होते आहे.
याचा मला अत्यंत आनंद आहे. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले होते.अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांना दोन वेळा चेकने ११ कोटी रुपये दिले. पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच कोटी आणि नंतर सहा कोटी रुपयांचे चेक दिलेत.
सिंघवी म्हणालेत की, राजस्थानमध्ये सिंघल कुटुंबाकडून देण्यात आलेले दान आतापर्यंत राज्यातील सर्वांत जास्त आहे. मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान पंतप्रधानांसोबत सिंघलदेखील उपस्थित होते. सिंघल कुटुंबीय राजस्थानमधील उदयपूर येथे राहतात. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी सिंघल कुटुंबातील सलिल सिंघल उपस्थित होते.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राम मंदिर ट्रस्टने या कुटुंबाला आमंत्रण पाठवले त्यावेळी अरविंद सिंघल आजारी होते म्हणून त्यांनी सलिल यांना पाठवले होते. उद्योगपती अरविंद सिंघल हे राजस्थानचा ‘व्हॉल्कन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. खाण क्षेत्राव्यतिरिक्त विद्युत उपकरणे निर्मिती क्षेत्रातही त्यांची कंपनी काम करते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला