ब्रिटीशांचा ‘डग बिगन बंगला’ आज ‘वर्षा’ मुख्यमंत्री निवास म्हणून ओळखला जातो, तो वसंतराव नाईकांमुळेच !

Dug Begun Bungalow - Varsha

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली पण याचं दुःख मनात न धरता खुल्या मनानं महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा राहत्या गावी सत्कार केला. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे पहिलं आणि शेवटचं उदाहरण.. असा मोठ्या मनाचा मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही झाला तर फाशी जाईन, ही जाहीर घोषणा असो की स्थानिक स्वराज संस्थेची रचना.. अशा अनेक रचनात्मक गोष्टींमध्ये वसंतराव नाईकांचा मोठा वाटा होता. वसंतराव नाईकांचा (Vasantrao Naik) बारा वर्षाचा (Varsha) मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अत्यंत प्रेरणादायी होता. त्यांनी महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या. त्यातलाच एक सध्याचा वर्षा बंगला.

२० जानेवारी १९७५ सत्तेची कवचकुंडलं ठेवून वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार झाले. वर्षा बंगल्याशी असणारा त्यांचा २९ वर्षांचा प्रदिर्घ सहवास संपुष्टात आला.

“साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल…” वसंतराव बंगला सोडताना एक हितचिंतक त्यांना म्हणाला यावर उत्तर देताना वसंतराव नाईक म्हणाले “आता ते होणे नाही… आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही- आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरिय्‌ड. आय वॉज ऑन द ग्राऊंड. आता पुरे!

जेष्ठ साहित्यीक मधु मंगेश कर्णिका यांनी लिहलेल्या ‘दूत पर्जन्याचा’ या वसंतराव नाईकांच्या चरित्रातली हा संवाद  वर्षा बंगल्याचं नाईकांच्या  आयुष्यात काय स्थान होतं हे अधोरेखित करतो आणि याच चरित्रात आपल्याला वर्षा बंगल्याची कुळ कथा वाचायला मिळते.

यवतमाळच्या गहुली गावात जन्मलेल्या बंजारा कुटुंबातील युवकानं वकीलीचं शिक्षण घेत राजकारणात उडी घेतली आणि संघर्षाच्या लाटा तरुन तो सत्तेच्या किनाऱ्यावर पोहचला. मध्यप्रांताचा राजस्व उपमंत्री, राज्य पुनर्रचनेनंतर  विदर्भाचा महाराष्ट्रात सामावेश झाला. द्विभाषिक राज्याचे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या वाट्याला त्यांच्या जिव्हाळ्याचं कृषी खात आलं आणि मंत्री म्हणून ‘डग बीगन’ बंगला आला.

वसंतराव नाईक मुळातच हौशी माणूस आणि वत्सलाबाईंना टापटीप राहण्याची आवड. बंगला तसा साध्या बांधणीचा. सगळीकडून मोकळे दरवाजे, वत्सलाबाईंनी वाटलं सगळ्यांनी नाकारलेला बंगला तर आपल्या वाट्याला आला नाही ना ?  वसंतराव म्हणाले, “घर छान आहे, याला घरंदाजपणा आहे.”

वसंतरावांचा मुलगा अविनाश याच्या वाढदिवासा दिवशी त्यांनी बंगल्यात प्रवेश केला ७ नोव्हेंबर १९५६ ला. पाऊस हा नाईकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्यांनी या बंगल्याचं नाव ठेवलं वर्षा. वर्षा बंगल्याच्या आवारात त्यांनी आंबा, लिंबू, सुपारींची झाडं लावली आणि खऱ्या अर्थ्यांन वर्षा आणि निसर्गाचा सहसंबंध त्यांनी अधोरेखीत केला.

यशवंतराव दिल्लीला गेले नंतर मुख्यमंत्री झालेल्या दादासाहेब कन्नमवारांच्या निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. मंत्रीमंडळाची पहिली बैठक आटोपून वसंतराव बंगल्यावर आले तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब म्हणाले, “शेवटी  या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकीक मिळणार असं दिसतयं” वसंतराव म्हणाले होय बाबासाहेब! छप्पन साली आम्ही मोठ्या बाबाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवसा दिवशी वर्षावर रहायला आलो तेव्हापासून एक वर्ष वगळता सारचं काही सुखात गेलं. ते वाईट गेलं ते १९६२ वर्ष जेव्हा वसंतरावांची एकुलती एक मुलगी बेबी जग सोडून गेली होती. वसंतराव आणि त्यांची पत्नी वत्सला यांच आद्यअक्षर व आणि वर्षा बंगल्यातही व त्यामुळं सह्याद्री, विंद्यांद्रीला न जाता वर्षालाच मुख्यमंत्री निवास बनवावं हा विचार वसंतरावांनी पक्का केला.

वसंतराव मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पंचायत राज योजना, कोयना भुकंपग्रस्तांचे पुनर्वसन, विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट दर्जा, कृषी विद्यापीठांची स्थापना, जिल्हा नियोजन मंडळांची निर्मिती आदी असंख्य ऐतहासिक नोंदी असलेल्या प्रभावशाली कामं केली.

वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच वर्षा बंगल्यातील मुक्काम हलवला पण वसंतरावांच्या हृदयात वर्षाऋतू कायम घर करुन होता. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्याच्या हितासाठी काम केलं. निर्णय घेतले. राजीनाम्यानंतर वसंतराव नाईक पूसदला परतले पण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी वर्षा ठेवून गेले.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER