‘पॉवर ट्रेडिंग’ हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिले : राष्ट्रवादीचा आरोप

Devendra Fadnavis & Nawab Malik

मुंबई :- महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) नुकतेच वर्ष पूर्ण केले आहे. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘पॉवर ट्रेडिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. पहाटेचा शपथविधी ते शरद पवारांची भूमिका काय होती, असे सगळेच खुलासे करताना शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. या पुस्तकातील दाव्यांवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच लिहिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे. ज्यांनी बेइमानीनं सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केलं आहे. ज्या पद्धतीने भाजपाने ८० तासांचं सरकार बनवलं, त्यावरून भाजपाची प्रतिमा मलिन झाली.  यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं, असा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाला एक वर्ष पूर्ण होत असताना आता या काळात नेमकं काय घडलं? यावर लेखिका प्रियम गांधी यांनी पुस्तक लिहिलं आहे. राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना साथ देत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र या घटनेमागे अनेक पैलू पुस्तकातून उलगडण्यात आले आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचा डाव खेळला. भाजपाला पाठिंबा देण्यासाठी पवारांनी त्यांच्या दोन विश्वासू शिलेदारांना वर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पाठवले आणि राष्ट्रवादी भाजपासोबत येत सरकार बनवण्यासाठी तयार आहे, अशी इच्छा सांगितली.

ही बातमी पण वाचा : ‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावे, हाच पवारांचा अंतिम निर्णय होता’, राष्ट्रवादीची स्पष्टोक्ती

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली.  या बैठकीत सगळं निश्चित करण्यात आलं. कोणाला कोणतं मंत्रालय मिळणार, मंत्रिमंडळात किती जागा वाट्याला येणार यावर सहमती झाली. या बैठकीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपात यांच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला तेव्हा जनतेला काय सांगायचं हा प्रश्न समोर आला.

तेव्हा शरद पवारांनी सांगितले, आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मदत करू. त्यानंतर पुढील १० दिवस मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतो. माध्यमांना सांगताना, महाराष्ट्रात एका स्थिर सरकारची गरज आहे, त्यासाठी राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर करणार होते. मात्र काही दिवसांनी शरद पवारांचे मन बदलले आणि त्यांनी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. पक्षातील अनेक नेते भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी उत्सुक होते.

त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेले. त्यांना शरद पवार आता भाजपासोबत येण्यास तयार नाहीत असं सांगितलं; पण पक्षातील अनेक नेते भाजपासोबत येण्यास तयार असल्याचंही फडणवीसांना सांगितले.  त्याचसोबत अजित पवारही भाजपासोबत येण्यास तयार आहेत. त्यासाठी तुम्ही अजित पवारांशी संपर्क ठेवा आणि आपला जो मूळ प्लॅन आहे, त्याच्यावर अंमलबजावणी करा, असे  त्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

शरद पवार एकीकडे भाजपासोबत सरकार बनवण्यासाठी चर्चा करत होते, तर दुसरीकडे ते काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबतही चर्चा करत होते. शरद पवार यांना काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) जास्त अधिकार देण्यास तयार होते, तर भाजपासोबत गेल्यास शरद पवारांना राज्यात देवेंद्र फडणवीस, केंद्रात अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुळवून घ्यावे  लागणार होते. अशातच शरद पवार यांना काँग्रेस-शिवसेनेसोबत गेल्यास जास्त फायदा होईल असं वाटलं. आणि ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलली, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER