मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचे शव आढळले; आत्महत्या की घातपात? खळबळ

The body of a car owner was found outside Mukesh Ambani's house

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन मनसुख यांचे शव कळवा खाडीत आज आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते.

हकीगत अशी की, गाडीची ओळख पटू नये म्हणून अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या त्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून मिटवण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून गाडीची ओळख पटली. ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती चौकशीत उघड झाले. गाडीच्या चोरीची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. चौकशीत गाडी ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची असल्याचे आढळले.

लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. ऑपेरा हाउस येथे काम असल्याने १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारी ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाले. तिथे सर्विस रोडवर गाडी पार्क करून मनसुख निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी ते गाडी नेण्यासाठी ऐरोली ब्रिज परिसरात गेले तेव्हा गाडी तिथे नव्हती. मनसुख यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली.

ती स्कॉर्पिओ जुनी होती. त्या जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. त्या काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती. आज त्यांचे शव सापडल्याने संशय निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER