‘बीएमसी’ स्थायी समितीची बैठक प्रथमच झाली ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने

BMC

मुंबई : उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी समितीची बैठक शुक्रवारी दुपारी प्रथमच ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने पार पडली. शहरातील कोरोना (Corona) महामारीचा वाढता प्रसार लक्षात घेऊन ही बैठक ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून घेण्यात आली.

विषयपत्रिकेवरील एकूण ३५ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ही ‘व्हर्च्युअल बेठक’ आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार गुरुवारी दुपारी व्हायची होती. परंतु विनोद मिश्रा व मकरंद नार्वेकर या स्थायी समितीच्या दोन ‘भाजपा’ सदस्यांनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. सुरेश गुप्ते व न्या. अभय आहुजा यांनी केलेली सूचना मान्य करून बैठक २४ तास पुढे ढकलून ती शुक्रवारी दुपारी घेण्याचे ठरले.

मिश्रा व नार्वेकर यांचे वकील अ‍ॅड. जीत गांधी यांनी असा मुद्दा मांडला की, बैठकीची विषयपत्रिका ३५ विषयांचा समावेश असलेली भरगच्च अशी आहे. हे विषय शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असे आहेत. ‘व्हर्चुअल’ बैठकीत एवढ्या सर्व विषयांवर परिणामकारक चर्चा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ‘व्हर्चुअल’ बैठक न घेता नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष बैठक घेण्यात यावी. गेल्या ऑक्टोबरमध्ये असाच मुद्दा आला होता तेव्हा न्यायालयाने प्रत्यक्ष पद्धतीने बैठक घेण्यास सांगितले होते, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

परंतु न्यायमूर्तींना हा मुद्दा पटला नाही. न्या. गुप्ते म्हणाले की, आम्ही इथे सर्व प्रकारच्या प्रकरणांची ‘व्हर्चुअल’ सुनावणी घेतो. तेव्हा पालिकेच्या स्थायी समितीची बैठकही त्याच पद्धतीने घेता येणार नाही, हे आम्हाला पटत नाही.

वरील मुद्दा न्यायालयास पटत नाही हे पाहिल्यावर अ‍ॅड. गांधी यांनी दुसरा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, कायद्यानुसार बैठकीची नोटीस किमान २४ तास आधी द्यावी लागते. पण गुरुवार दुपारच्या या बैठकीची नोटीस बुधवारी रात्री देण्यात आली आहे. यावर नियमाची पूर्तता करण्यासाठी बैठक गुरुवारऐवजी शुक्रवारी घेणे शक्य होईल का, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. महापालिकेचे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी लगेच पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला व बैठक शुक्रवारी घेण्यास प्रशासन तयार असल्याचे कळविले. त्यानुसार बैठक शुक्रवारी ‘व्हर्चुअल पद्धती’ने घेण्याचे निर्देश देऊन याचिका निकाली काढण्यात आली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button