कृष्णमेघालाही आहे रूपेरी किनार…

Nawab Malik - Remdesivir - Editorial

Shailendra Paranjapeकरोनाच्या (Corona) संसर्गाच्या काळात माणसाला जीवनाचे महत्त्व समजते आहे. अमेरिकेत एका माणसाने करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडचे पैसे भर चौकात जाऊन उधळायची इच्छा आपल्या मित्राकडे व्यक्त केली आणि त्यानेही भर चौकात नोटांची पुडकी सोडून उधळत जनतेला संदेश दिला की पैसे संपत्ती व्यर्थ आहे आणि आपला जीवच सर्वात मौल्यवान आहे. पैसे फुकट मिळताहेत म्हटल्यावर ते गोळा करायला अगदी अमेरिकेतली माणसंही गर्दी करायला लागली. या पैसे उधळणाऱ्या माणसाचा आणि ते गोळा करणाऱ्यांचा व्हिडियो सोशल मिडियावरून व्हायरल झालाय.

एकीकडे महाराष्ट्राचे मामु माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडियो कॉन्फरन्स बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना करोनावरून राजकारण करू नका, हे सांगा अशी विनंती करतात आणि दुसरीकडे त्यांच्या सरकारचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) केंद्र सरकारवर रेमडिसिव्हरवरून राजकारण केल्याचा आरोप करतात, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्या ट्विट्सना उत्तर दिले आहे आणि आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.

राज्याच्या काही भागात आणि पुण्याच्याही काही भागात रेमडिसिव्हरचा (Remdesivir) काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलेय. पुण्याच्या ग्रामीण भागात तर चक्क रेमडिसिव्हरच्या इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्या घेऊन त्यात शिरेतून घ्यावयाचे द्रवरूप पँरासिटामॉल तयार करून तेच रेमडिसिव्हर म्हणून विकणारी टोळी पोलिसांनी पकडलीय.

करोनानं माणसाच्या आयुष्याचा क्षणभंगुरपणा खरे तर सर्वांच्याच लक्षात आलाय पण तरीही करोनानं जगणं इतकं अवघड केलंय की माणसांचं वागणंच या रोगानं बदलून टाकलंय आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या गाण्याप्रमाणे मानसापरास मेंढरं बरी, असं वाटावं अशा या तीनही घटना आहेत. माणसं सगळीकडे सारखीच भले ते प्रगतीहीन, प्रगतीशील किंवा प्रगत देश असोत. करोनानं खऱ्या अर्थाने लेव्हल प्लेइंग फिल्ड तयार केलेय आणि करोनासारख्या रोगासाठी सगळे सारखेच आहेत, हेही पुन्हा पुन्हा सिद्ध झालेय. अनेकदा प्रगत देशांमधे बर्फवृष्टी, एखादे फयान वादळ, भूकंप अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या वेळी माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत. तरीही माणूस काही शहाणा व्हायला तयार नाही आणि म्हणूनच मग तथाकथित भौतिक प्रगतीत किंवा ऐहिक सुखांमधे सारं काही मिळत नाही, हेच मृत्यूनंतर आपले पैसे लोकांमधे उधळून टाकणाऱ्या ऐश्वर्यवंताला वाटत असावं.

सत्तेची साठमारी आणि त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप भारतीय राजकारणाला नवे नाहीत. पण करोनासारख्या प्राणघातक साथीच्या काळातही राजकीय आरोपांचे फड रंगत असतील तर जनतेने त्यात हस्तक्षेप करायला हवा, असे प्रकर्षाने वाटते. एकदा निवडणुका झाल्या की नेते पाठ फिरवतात आणि पाच वर्षांनीच उगवतात, ही पूर्वीची तक्रार आता करण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्रावर केलेले आरोप असोत की त्याला केंद्राने दिलेले प्रत्युत्तर, हे सारं आम्हाला योग्य वाटत नाही, हे तरी किमान जबाबदार जनता म्हणून प्रत्येकाने व्यक्त करायला हवे. आता मोबाइल नावाचे यंत्र आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्या अवाक्यात आलेले आहे. त्याचा प्रभावीपणे वापर करायला हवा आणि केवळ सोशल मिडियावरून वा व्हाट्स अप ग्रुपमधून नव्हे तर थेट सरकारी वेबसाईट्सवरून सर्वच पातळ्यांवरच्या राज्यकर्त्यांना नागरिकांनी आपले निषेध किंवा अनुकूलताही प्रभावीपणे व्यक्त करायला हवी. म्हणजे मग दर पाच वर्षांनी मतांचा जोगवा मागणारे आणि तो देणारे, हे दोघेही किमान उत्तरदायी होतील.

रेमडिसिव्हरचा काळा बाजार किंवा नकली औषध बनवणारे हेही आपल्याच समाजात तयार झालेले आहेत, याचे भान ठेवून लोकशाही मार्गाने त्यांना शिक्षा करायलाच हवी. पण त्याबरोबरच मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खायची प्रवृत्ती अगदी करोना संकटाच्या काळातही संधी शोधत असते, याचेच दर्शन या घटना घडवतात.

करोनाच्या कृष्ममेघाला एक रुपेरी किनारही आहे. पुण्यातले मनसेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी शंभर खाटांचे रुग्णालय केवळ करोनाच्या रुग्णांसाठी एका रुग्णालयाच्या मदतीने सिद्ध केलेय. कॉँग्रेसचे पालिकेतले गटनेते आबा बागूल यांच्या पुढाकारातून गणेश कला क्रीडामंच या पालिकेच्या करमणूक सभागृहात शंभर खाटांचे केवळ प्राणवायूसज्ज खाटांची सुविधा तयार होतेय. त्याला पालिका आणि खासगी सहभागाचंही पाठबळ आहे. वास्तविक, सगळीकडे अंधार पसरत असताना मोरे किंवा बागूल यांच्यासारख्यांचे प्रयत्न म्हणजे एक छोटीशी पणती लावण्याचे स्तुत्य उपक्रम आहेत. अशा पणत्या वाढल्या तरच अंधार आपसूक दूर होईल. करोना हरेल माणुसकी जिंकेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button