कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टास्क फोर्सला सज्ज राहण्याचे आवाहन

uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- राज्यावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचे आवाहन केले.

कोरोनावर अजूनही हमखास औषध आपल्याकडे नाही. कोविडच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोविडची प्रचंड दहशत होती, आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठे आणि भयानक आहे हे जाणवू लागले होते. आपण यावर न डगमगता पावले टाकली, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

कोविड विरुद्धची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंबप्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण कोरोना विषाणूंचा नायनाट करूया. रुग्ण सर्वांत जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरवर ठेवतात. त्या माझ्या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

“७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणं नसणारे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण काही दिवसांनी मृत्युदर वाढला असं लक्षात येतं. तेथील डॉक्टर हे रुग्ण उशिरा आल्याचं सांगतात. घरच्या घरी अंगावर ताप  काढतात. त्यांच्यात इतर लक्षणेही असतात. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणू शकता. ही लक्ष्मणरेषा ओळखायची कशी हे काम तुम्ही करायचं आहे.

घरच्या घरी उपचारांचं होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचलले पाहिजे. घरच्या घरी उपचार घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. पण त्यांच्या उपचारावर लक्ष देणे, योग्य औषध देणे यासाठी तुम्हाला काम करायचे आहे.” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

“कोविड झाल्यानंतर रुग्णाचं शरीर साखरेचं पोतं होऊ नये आणि ज्यांना डाबेटिस आहे ते नियंत्रित ठेवणं, इतर सहव्याधींवरही नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. तर आपल्याला संकट वेळीच रोखता येईल. घरच्या घरी उपचाराची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तसंच नजीकच्या जम्बो सेंटर्समध्ये आपण सेवा देऊ शकलात तर रुग्णांनाही दिलासा मिळेल.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळणार असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. १ जूनपासून पावसाळा सुरू होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचं आव्हान असणार आहे.’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. यावेळी डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सामन्याची तयारी करा – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button