कोरोनाविरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास

CM Uddhav Thackeray

मुंबई :- पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना (Corona) संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र, अर्थचक्राला झळ बसू नये याचीदेखील काळजी घेत आहोत, तसेच ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच… असा आत्मविश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांचीसुद्धा मदत घेण्यात येत आहे. रुग्णांना तत्काळ योग्य ते उपचार सुरू व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले. व्हर्च्युअल पद्धतीच्या बैठकीत देशातील सर्वांत जास्त कोरोना संसर्ग फैलावलेल्या इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “रोगप्रतिकारक किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना एकाकी घरात घरी ठेवले जात आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक औषधे दिली जात आहेत. मेडिकल विद्यार्थ्यांना निवृत्त डॉक्टरांच्या जोडीने मदत केली जात आहे.”

रेमडेसिवीर व लस वाढवावा
महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे, तसेच रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नाही, वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आला. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता, त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे.

रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे, ते सांगता येत नाही. पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे, त्या दृष्टीने राज्याला रुग्णसंख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा. राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली आहे. याबाबत पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा, तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे, जेणेकरून योग्य ते धोरण ठरवता येईल.”

“आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत आहोत. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button