तपास वेळेत पूर्ण न झाल्यास जामीन मिळणे हा ओरोपीचा मुलभूत हक्क

सुप्रीम कोर्टाने केला महत्वपूर्ण खुलासा

Court Decision

नवी दिल्ली :- फौजदारी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र सादर करण्यासाठी कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मुदतीत तपासी यंत्रणेने तपास पूर्ण न केल्यास, केवळ तेवढ्याच कारणावरून जामीन मिळणे हा आरोपींचा मुलभूत हक्क आहे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे.

असा जामिनास कायद्याच्या भाषेत तपासी यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे मिळणारा जामीन (Default Bail) ) असे म्हटले जाते. दंड प्रकिया संहितेने तपास पूर्ण करण्यासाठी कमाल ९० दिवसांची कालमर्यादा ठरविलेली आहे. तपास मुदतीत पूर्ण होण्यास सबळ कारण असेल तर न्यायालय ही मुदत आणखी ३० दिवसांनी वाढवू शकते किंवा आरोपपत्र दाखल केल्यावरही उरलेला तपास पूर्ण करून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा देऊ शकते. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासारख्या (UAPA Act ) विशेष कायद्यात ही मुदत १२० दिवसांची आहे व ती आणखी दोन महिन्यांनी वाढविली जाऊ शकते.

न्या. रोहिंग्टन फली नरिमन, न्या. नविन सिन्हा व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंंडपीठाने म्हटले की, दंड प्रक्रिया संहितेचे कलम १६७(२) अथवा ‘यूएपीए’ कायद्याच्या कलम ४३ अन्वये ‘डिफॉल्ट बेल’ मिळण्याचा आरोपीचा हक्क हा केवळ कायदेशीर हक्क नव्हे तर संविधानाने दिलेला मुलभूत हक्क आहे. कारण फौजदारी खटल्यातील आरोपीस संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार, त्याच्याविरुद्धचा खटला फक्त कायद्याने सुप्रस्थापित अशा प्रक्रियेनेच चालविला जाण्याचा मुलभूत हक्क आहे. तपासी यंत्रणेने तपास ठरलेल्या मुदतीत पूर्ण करणे व तसे न केल्यास जामीन मिळणे हा अशा सुप्रस्थापित प्रक्रियेचाच भाग असल्याने ‘डिफॉल्ट बेल’ मिळणे हा आरोपीचा मुलभूत हक्क ठरतो.

विक्रमजीत सिंग या ‘यूएपीए’ कायद्यान्वये खटला सुरु असलेल्या पंजाबमधील आरोपीने केलेल्या अपिलावर खंडपीठाने हा निकाल दिला. त्या प्रकरणातील तथ्यांच्या अनुषंगाने खंडपीठाने असेही स्पष्ट केले की, या विशेष कायद्याने तपासासाठी ठरलेली मुदत वाढवून देण्याचा अधिकार फक्त विशेष न्यायालयास आहे. दंडाधिकारी अशी मुदतवाढ देऊ शकत नाहीत. शिवाय ‘यूएपीए’ कायद्यातील गुन्ह्यांचा तपास राज्य पोलिसांनी केलेला असला किंवा राष्ट्रीय तपासी यंत्रणेने () केलेला असला तरी असा खटला फक्त त्या कायद्यान्वये स्थापन केल्या गेलेल्या विशेष न्यायालयापुढेच चालविला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER