तृतीयपंथीला महिला म्हणून निवडणूक लढण्याची मुभा औरंगाबाद खंडपीठाने केले मुलभूत हक्काचे रक्षण

Aurangabad Bench of the bombay High Court

औरंगाबाद : अंजली गुरु संजना जान या तृतीयपंथी व्यक्तीस जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून लढण्यास पात्र ठरवून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of the High Court) त्या व्यक्तीच्या मुलभूत हक्कांचे रक्षण केले आहे.

४२ वर्षांच्या अंजलीने निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. तिच्या अर्जाला अन्य कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतला नाही. पण निवडणूक निर्णय अधिकार्‍याने (Returning Officer)  तो फेटाळला. याविरुद्ध अंजलीने औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. ती मंजूर करून न्या, रवींद्र घुगे यांनी अंजलीचा अर्ज वैध मानावा असा ओदश देऊन तिला महिला म्हणून महिलांसाठीच्या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढण्याची मुभा दिली.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेला तृतीयपंथीयांच्या हक्क रक्षणाचा कायदा (Transgender Persons Protection of Rights Act) आणि तृतीयपंथीयांना स्वतंत्रपणे लैंगिक ओळख बहाल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा सन २०१४ मधील निकाल (राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण वि. भारत सरकार व इतर) यांचा मुख्यत: आधार घेत ही याचिका केली होती. अंजलीचे वकील अ‍ॅड. ए.पी. भंडारी यांनी असा युक्तिवाद केला की, संदर्भीत कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तृतीयपंथी व्यक्तीस स्वत:ला स्त्री मानायचे की पुरुष मानायचे हे ठरविण्याचा हक्क आहे. त्यानुसार अंजलीने स्वत:साठी ‘स्त्री’ हे लिंग स्वीकारले आहे व यापुढे आयुष्यभर तेच लिंग कायम ठेवण्याचा तिचा ठाम निर्धार आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍याने बहुधा कायद्याच्या अज्ञानामुळे व मनाचा गोंधळ झाल्याने अंजलीचा अर्ज फेटाळला होता. अंजली स्त्री नाही व पुरुषही नाही. पण वॉर्ड मात्र महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे ती तेथून निवडणूक लढण्यास अपात्र आहे, असा बहुधा त्यांनी विचार केला असावा. पण त्यांचा हा समज चुकीचा होता. राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनीही न्यायालयात तीच भूमिका घेतली व आपण कायद्याच्या बाहेर जाऊन कोणताही युक्तिवाद करणार नाही,असे सांगितले.

न्या. घुगे यांनी म्हटले की, अंजलीने कायद्याने तिला दिलेला हक्क बजावत स्वत:ला स्त्री मानले आहे व भविष्यात कधीही संधीसाधूपणा करून स्वत:ला पुरुष म्हणवून न घेण्याचे अभिवचन तिने न्यायालयास दिले आहे. अशा परिस्थितीत अंजली शारीरिकदृष्ट्या नसली तरी कायद्याच्या दृष्टीने स्त्री ठरते. त्यामुळे अन्य सर्व निकषांवर पात्र ठरत असल्याने तिला निवडणूक लढण्यापासून वंचित करता येणार नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER