“आर्ट ऑफ सेइंग नो ! “( भाग दुसरा)

आय विन , यू विन !

i Win You Win

हाय फ्रेंड्स ! मागील लेखामध्ये आग्रहीपणा व आक्रमक पणा यातला फरक नेमका काय? तसेच ठामपणे नाही म्हणण्याची कला म्हणजे काय? हेही आपण बघितले. ठाम पणाचे फायदे आणि ज्यांना नाही म्हणता येत नाही ,त्या लोकांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे बघितले.

एकूणच आंतरवैयक्तिक संबंधांची जोपासना व सामाजिक कौशल्य यांच्या विकासासाठी ठाम पणाचे व निश्चयपूर्वक वागणे गरजेचे असते. थेटपणे, प्रामाणिकपणे ,औचित्य राखत, स्व हक्कांची जाणीव ठेवून, पण त्याचवेळी इतरांच्या गरजा ,भावना ,आणि आदर राखत केलेले हे संभाषण ! अशी व्यक्ती अनाठायी चिंता करत नाही ,निराशही लवकर होत नाही ,आणि विशेष कार्यक्षम असते. म्हणजेच अशा प्रकारच्या वर्तनाची ची वैशिष्ट्य आपल्याला जाणवतात.

१) निष्क्रिय किंवा पॅसिव्ह : आय लूज ,यू विन!
२) आक्रमक किंवा अग्रेसिव्ह : आय विन, यु लूज!
३) ठाम , निश्र्चयी, असरेटिव : आय विन , यू विन!

बरेचदा आपला असा गैरसमज असतो की आक्रमक भूमिके शिवाय लोकांना आपले महत्त्व कळतच नाही .पण वास्तवात असं नाही ! आपण जेव्हा ठामपणा चे सूत्र अमलात आणतो, त्यावेळी लक्षात येतं की स्वतःचे अधिकार आणि हक्क जपत असूनही ,इतरांचे हक्क ,भावना ,गरजा यांचाही आदर करता येतो .हेच असरेटिव चे महत्त्व आहे. मुळात माझे मूलभूत अधिकार कोणते? हे जर कळलं तर खंबीरतेकडे वळणे सोपे जाते.

१) मी कोण आहे म्हणजे मी काय करते / करतो याबद्दल आदर बाळगणे .आणि जीवनातल्या इतर भूमिका पार पाडत असताना सुद्धा एक व्यक्ती म्हणून माझ्या काही गरजा आहेत, त्यांच्याकडे स्वतंत्र लक्ष पुरवणे.
२) मला चुका करण्याचा अधिकार आहे ,तसेच मला काय हवे हे सांगण्याचा अधिकार आहे .माझे मत किंवा विचार याच्यामध्ये देखील मी बदल करू शकतो किंवा शकते.
३) एखादी गोष्ट माहीत नाही किंवा समजली नाही तर तसे सांगण्याचा अधिकार आहे किंवा अपराधीपणाची कुठलीही भावना मनात न ठेवता, कुठल्याही गोष्टीला नकार किंवा होकार देऊ शकतो/ते.
४) मला स्वतःला गोपनीयतेचा, खाजगीपणाचा, एकांताचा, स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
५) स्वतःचे निर्णय, स्वतंत्रपणे घेऊन, त्यांच्या परिणामांना सामोरे जाण्याचा अधिकार आहे. तसेच इतरांच्या वर्तनाची जबाबदारी माझ्यावर येत नाही हे सांगण्याचाहि मला अधिकार आहे.

वरीलपैकी कित्येक गोष्टी करताना आपल्याला संकोच वाटत असतो. आणि आपण त्यासाठी आपले अधिकार बाजूला ठेवून, समोरच्याला नाही म्हणू शकत नसतो. “नाही मला आज खरेदीला यायची इच्छा ! मला घरातच एकटीला बसायचं आहे !”

किंवा “समोरच्या ने एक विशिष्ट वर्तन केलेले आहे, त्याला मी जबाबदार नाही ! आणि त्याबाबत काळजी करण्याची मला गरज नाही”.जसे की उदाहरणार्थ, “कुणीतरी अकारण आपल्यावर रागावतो, रुसत. समोरच्याचा काहीतरी गैरसमज झालेला असतो. काहीही ऐकून घ्यायची समोरच्याची तयारी नाही!” तेव्हा त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी वेळ देणे, एवढेच माझ्या हातात असते .मी चूक केलेली नसेल तर त्या रुसण्याची जबाबदारी मला उचलण्याची गरज नाही.त्याला सफाई देण्याला मी बांधील नाही.

ठामपणे नाही म्हणण्यासाठी आपले अधिकार माहित असणे आवश्यक आहे. तसेच नाही म्हणताना साधारण कुठले मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे ?कुठल्या मार्गांनी हे संभाषण जायला हवं? हे जर बघितलं तर आपण हा प्रयोग आपल्या संभाषणात करून पाहू शकाल.

 • पहिली गोष्ट संवाद साधत असताना समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन ,उद्देश ,त्यामागची भावना याची मनःपूर्वक ऐकून आदर करणे.(बरेचदा असं होतं की समोरच्याचे न ऐकता आपण केवळ आपल्याच मतावर दृष्टिकोनावर ठाम असतो आणि समोरच्याला ते पटवून द्यायचा आहे या भूमिकेत असतो) *नंतर समोरच्या चे मत नीट ऐकून घेतल्यावर नेमकी मतभिन्नता कुठे आहे ते point-out करायचे.
 • आता लक्षात ठेवावा लागते कि मतभिन्नता याचा अर्थ माणसामाणसातील वैर नाही. (हे स्वतःला सांगायचं)
 • मतभिन्नता याचा अर्थ प्रत्येक वेळी नात्याची अखेर असंही नाही.
 • मग या मतभिन्नते बद्दलची आपली बाजू पक्केपणाने निर्धाराने मांडणे.
 • मतभिन्नता दूर करण्याचे पर्याय समोरच्या व्यक्ती समोर ठेवणे.

हे झाले माझ्यासाठी पण समोरच्या साठी– 

 • या मार्गाने जात असताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.*
 • संभाषण हे नेमके मुद्देसूद ठेवावे
 • समोरच्या व्यक्ती समोरही आक्रमक आग्रही किंवा मिळत असे तीनही पर्याय आहेत
 • आणि माझ्याप्रमाणेच समोरच्या व्यक्तीलाही पर्याय निवडीचे स्वातंत्र्य आहे
 • तेव्हा त्याच्या माणूसपणाचा आदर राखणे *आणि त्याला एक व्यक्ती म्हणून स्वीकारणे

# निश्चय पणाने वागण्यासाठी उपयोगात येणारी तंत्रे #

१) चेहऱ्यावरील भाव, देहबोली ,हातापायांची हालचाल महत्वाची. एकूण व्यक्तिमत्त्व विकासामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. विशिष्ट पद्धतीने केलेल्या शारीरिक हालचालीतून ,चेहर्या मधील भाव-भावना मधून, उभे राहण्याच्या पद्धतीतून ,आत्मविश्वासही व्यक्त होत असतो. समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललेला आहे ?हे ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो . देहबोलीचे एक शास्त्र आहे. म्हणूनच आपण जे बोलतो आहे ते आणि आपल्या चेहर्‍यावरचे भाव सुसंगत हवे. कुठल्यातरी दुःखाच्या प्रसंगी आपण गेलो आहे आणि चेहऱ्यावर यावेळी स्मितहास्य दिले तर किती विजोड वाटेल. परंतु एखादी गोष्ट सकारात्मक रित्या मांडताना त्याला जर स्मितहास्याची जोड दिली परस्पर पूरक असेल. नजरेला नजर भिडवून ,सुस्पष्टपणे, स्वच्छ शब्दात ,आत्मविश्वासपूर्वक, थेटपणे केलेले संभाषण नेहमीच प्रभावी ठरते. आईस्क्रीम खायला गेल्यानंतर “तुला कुठला आईस्क्रीम हवे.” असे त्याने विचारले. तर यावर ती उत्तर देते की “कुठलही चालेल तुला जे हवं ते घे.”या ऐवजी “मला केशर पिस्ता आवडेल “अशा प्रकारचे उत्तर हे असरटिवेनेस कडे जाणारे आहे. अशी” मी किंवा मला” पासून सुरू होणारी वाक्य ही असरटिवेनेस दाखवणारी असतात.

२) ब्रोकन रेकॉर्ड टेक्निक यालाच जपमाळ टेक्निक असेही म्हणतात. चलाख लोकांना तोंड देताना ,वापरता येण्यासारखे हे अतिशय महत्त्वाचे,उपयुक्त टेक्निक आहे .आपला मुद्दा शांतपणे, सातत्याने ,कौशल्याने मांडत राहणे हे याचे वैशिष्ट्य ! एकच मुद्दा त्याच पद्धतीने परत परत सांगितल्यानंतर एेकणार्‍याला ते कंटाळवाणे होते .आणि समोरच्याला जे काय समजायचं ते समजतो. पूर्वीच्या काळी ग्रामोफोन च्या रेकॉर्डमध्ये पिन अडकली कि तेच तेच गाणं कसं परत परत वाजायचं किवा जप करताना तोच तो मंत्र म्हटला जातो तसे!

कोरोना काळामध्ये सगळ्यांकडेच पैशाची निकड जाणवते. वनिताने तिच्या कामाच्या बाईला ऑल- रेडी दहा हजार रुपये उसने दिलेले आहे .त्याची परतफेड अजून तिने केलेली नाही. आणि ती ५०० रू. परत मागते आहे.

 • “ताई मला पाचशे रुपये उसने पाहिजे होते. “
 • “नाही ग! माझ्या जवळ नाहीये .सध्या माझीच कडकी सुरू आहे!”
 • “नाही ताई सिलेंडर आणायचा होता, आज मी चुलीवर स्वयंपाक केला बघा!”
 • “हो का गं !गडबड झाली असेल ना तुझी? पण काय करणार माझ्याकडेच नाही!”
 • “अहो काय ताई तुमच्यासाठी माणसं, तुम्हाला कसली कडकी ? असतील न कुठे एकडे तिकडे ठेवलेले .परवा तुमच्या पुतणीसाठी नाही का टॉप पाठवला तुम्ही ? खरेदी पण केली.”
 • “बरोबर आहे! पण काही गोष्टी करणे मलाही आवश्यक असतात.अजून दहा-बारा दिवस राहिले महिना संपायला ,सर काढूच देत नाहीये बँकेतून पैसे !”
 • “काय ताई हो! मला आशा होती की तुम्ही मदत करणार म्हणून !
 • “हो गं ,मी तुला आत्तापर्यंत कधी नाही म्हणाले नाहीये, पण सध्या मला खरंच शक्य नाही!”

३) अाय स्टेटमेंट्स . मी , माझे ,मला ह्या शब्दांनी जर बोलण्याची सुरुवात झाली तर समस्येवर नेमकेपणाने लक्ष केंद्रित करता येते.” तुम्ही इथे गप्पा गोंधळ करू नका, मी लिहीत असताना !”त्याऐवजी “मला लिहिताना गडबड-गोंधळ आवडत नाही.”यातून असरटिवेनेस दिसतो.४) नकार देणे :सोपे व्हावे म्हणून तो आपला मूलभूत हक्क आहे, त्यामुळे क्षमस्व म्हणण्याची किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नसते .फक्त तो थेटपणे आणि प्रामाणिकपणे मांडला जावा. आणि एखादी विनंती पूर्ण मान्य नसली तरी काही तडजोड शक्य असते ती करण्याची तयारी ठेवावी.

“महालक्ष्मी बसवण्यासाठी मला माझ्या काकूकडे जायचे आहे .त्यामुळे मी तुला त्यादिवशी नाही येऊ शकणार मदतीला, त्याऐवजी आदल्या दिवशी मी तुझ्याकडे मुक्कामाला येते. सगळी तयारी आपण रात्री करून ठेवू !”

५) उपहासात्मक टिकेशी मुकाबला ! मागच्या उदा.मधील “ताई तुम्ही पुतणीला टॉप घेतला! खरेदी केली.”अशा प्रसंगी संवादाला वितंडवाद सुरू होऊ शकतात.ज्या लोकांमध्ये स्व आदराची भावना कमी असते ,ती वाढवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याच्या स्वाभिमानाला ते धक्का पोहोचवतात.

६) फागिंग (सारग्रहण) एखाद्याने केलेल्या जाणीवपूर्वक अतिशयोक्तीपूर्ण टीके ,मध्ये थोडा जरी खरा भाग असला तर त्याला धीराने सामोरे जायचं आणि फक्त सत्याचा तेवढा भाग घेऊन अपमान किंवा अवहेलना सरळ टाकून द्यायची. बरेचदा निराधार टीका केली जाते.”आळशी आहे तू !”असे एखाद्याने म्हणल्यानंतर क्वचित प्रसंगी आपण आळशी असू ,पण नेहेमी करता आपण अव्यवस्थित असू शकत नाही.

७) तसेच मनापासून केलेले कौतुक ,प्रशंसा स्वीकारता यायला हवी. कोणी स्वयंपाकाची स्तुती केली , तरी” काहीतरीच हो ! एवढी काही मी सुगरण बिगरण नाही!”याउलट जर एखादा पदार्थ आवडला, “वहिनी! डिंकाचे लाडू खूप छान झाले” .तर “घ्या की आणखीन एखादा किंवा डब्यात बांधून देते थोडे!” असा संवाद असावा. स्तुती ,निंदा ,टीका कशी करतो आणि ती आपण कशी स्वीकारतो यावर आपला “असरटिवेनेस” अवलंबून आहे.

ही बातमी पण वाचा :“आर्ट ऑफ सेइंग नो !”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER