भारतीय घटनेचे शिल्पकार जगाचा’; सुमधूर बुद्ध-भीम गीतमाला १३ एप्रिलला

Dr. B.R. Ambedkar

नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर म्युझिक टाईम ऑर्केस्ट्राच्यावतीने ‘शिल्पकार जगाचा’ हा सुमधूर बुद्ध-भीम गीतमालेचा कार्यक्रम शनिवार, १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होईल.

कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. संगीताच्या माध्यमातून भगवान बुदध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, शिकवण जनतेपर्यंत पोहोचावी, तसेच, एखाद्या सेवाभावी संस्थेला कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जावी या उद्देशाने या दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी वृद्धाश्रम आणि सेवाश्रम चालविणाऱ्या जीवन आश्रय सेवा संस्थेच्या सहायार्थ हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. मागील चार वर्ष डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, अनिल खोब्रागडे यांनी हजेरी लावली होती. यावर्षी पहिल्यांदाच सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

हि बातमी पण वाचा : कलाविष्कारातून छोट्या पडद्यावरही साजरी होणार यंदाची भीम जयंती

या कार्यक्रमाची संकल्पना सुनील गजभिये व मित्र परिवाराची आहे. पार्श्वगायक डॉ. अनिल खोब्रागडे, पार्श्वगायिका धनश्री बुरबुरे यांच्यासह चंद्रपूरच्या निशा धोंगडे, श्रद्धा यादव, शिलवंत सोनटक्के, गोल्डी हुमने, मनिष राय, मनोज बहादुरे हे कलाकार बुद्ध गीते व भीम गीते सादर करतील. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या निवेदिका ज्येाती भगत आणि आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक अशोक जांभुळकर यांचाही कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. संयोजन म्युझिक टाइम ऑर्केस्ट्राचे शैलेश ढोके यांचे आहे. संयोजक सुनील गजभिये, शैलेश जांभुळकर, अनिल सिरसाट, बि. के. सहारे हे आहेत. प्रवेश नि:शुल्क असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेतर्फे करण्यात आले आहे.