ज्येष्ठ वकिलांनी हेत्वारोप केल्याने सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली नाराजी

Supreme Court
  • कोरोनाचे स्वत:हून हाती घेतलेले प्रकरण तहकूब

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) महामारीची दुसरी जोरदार लाट पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा, अत्यावश्यक औषधांची टंचाई आणि ‘लॉकडाऊन’ लागू करण्याचे राज्यांचे अधिकार यासारखे विषय स्वत:हून हाती घेऊन त्यावर सुनावणी घेण्यावरून काही ज्येष्ठ वकिलांनी सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) आणि खास करून सरन्यायाधीशांवर हेत्वारोप केल्याने सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आता ही सुनावणी तहकूब करून सरन्यायाधीश न्या. बोबडे (CJI Sharad Bobde) यांच्या निवृत्तीनंतर म्हणजे येत्या मंगळवारी ठेवली आहे.

न्यायालयाने या प्रकरणात ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांना ‘अ‍ॅमायकस क्युरी’ म्हणून काम करण्यास सांगितले होते. परंतु हा वाद झाल्यावर साळवे यांनी ते काम करण्यास अनिच्छा दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त केले.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. एल. नागेश्वर राव व न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने कोरोना महामारीशी संबंधित हे विषय आपण थेट सर्वोच्च न्यायालयात स्वत:हून सुनावणीस घेणार असल्याचे गुरुवारी आधी तोंडी सांगितले. कदाचित विविध उच्च न्यायालयांमध्ये यासंबंधी प्रलंबित असलेल्या याचिकाही सर्वोच्च न्यायालयात वर्ग करून घेतल्या जाऊ शकतात, असेही न्यायमूर्तींनी सूचित केले होते. यासंबंधीचा औपचारिक आदेश खंडपीठाने नंतर संध्याकाळी दिला. पण त्यात उच्च न्यायालयांमधील प्रकरणे वर्ग करण्याचा किंवा त्यांना स्थगिती करण्याचा उल्लेखही नव्हता. हा आदेश न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होण्याआधीच माध्यमांतून त्यावर टीका सुरु झाली. वृत्तवाहिन्यांशी बोलताना काही ज्येष्ठ वकिलांनी न्यायाधीशांवर व खास करून सरन्यायाधीश न्या. बोबडे यांच्यावर हेत्वारोप केले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि गुजरात हायकोर्ट बार असोसिएशन या वकील संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांवर कुरघोडी करण्यास विरोध करणारे औपचारिक अर्जही दाखल केले.

या पार्श्वभूमीवर हे ‘सुओ मोटो’ प्रकरण शुक्रवारी सकाळी खंडपीठापुढे आले तेव्हा न्यायाधीशांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ वकील विकास सिंग यांना न्या. राव म्हणाले, काल आम्ही दिलेला आदेश तुम्हा वाचलात ना? त्यात उच्च न्यायालयांकडील प्रकरणे आमच्याकडे वर्ग करून घेण्याची आमची मनिषा तुम्हाला कुठे दिसली? आदेश न वाचताच त्यात जे म्हटलेलेच नाही त्यावरून टीका सुरु झाली. अशा तºहेने तुम्ही संस्था (सर्वोच्च न्यायालय) उद्ध्वस्त करत आहात.

गुजरात हायकोर्ट बार असोसिएशनसाठी काम पाहणाºया ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना उद्देशून न्या. भट म्हणाले, आम्ही दिलेला आदेश न वाटताच तुम्ही आमच्यावर हेत्वारोप केले. त्यावर दवे म्हणाले की, तुम्ही उच्च न्यायालयांमधील प्रकरणेही तुमच्याकडे वर्ग करून घेणार, असा केवळ आमचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा समज झाला. तुम्ही याआधी असे अनेक वेळा केलेही आहे. यावर न्या. भट यांनी त्यांना सुनावले, कसल्या समज झाल्याच्या गोष्टी सांगता? आम्ही तसा एक शब्दही उच्चारला नव्हता किंवा उच्च न्यायालयांना त्यांच्यापुढेल प्रकरणे ऐकू नका, असेही सांगितले नव्हते.

याच अनुषंगाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, विकास सिंग व दुष्यंत दवे यांच्यात शाब्दिक चकमकी घडल्या. दवे यांनी मेहता यांना टोमणा मारला की, तुम्हीही स्वत:चे काही तरी समज करून घेता आणि ते न्यायालयापुढे मांडत असता. गेल्या वर्षी लाखो स्थलांतरित मजूर घरी परतण्यासाठी रस्त्यांवरून पायपिट करत असताना तुम्ही ‘एकही स्थलांतरित मजूर रस्त्यावर नाही’ असा समज करून घेतला होतात व त्या तुमच्या समजुतीवर न्यायालयानेही विश्वास ठेवला होता. सरन्यायाधीश न्या. बोबडे यांचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हे कडवट वातावरण टाळून आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे निरोप द्यायला हवा, यअसे मेहता म्हणाले.

हे सर्व सुरु असताना ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी ‘अ‍ॅमायकस’ म्हणून काम करण्याची आपली इच्छा नाही, असे सांगून आपल्याला त्यातून मोकळे करण्याची विनंती केली. ते म्हणाले, हे प्रकरण खूप महत्वाचे व संवेदनशीलही आहे. मी सरन्यायाधीशांचा शाळा-कॉलेजपासूनचा मित्र आहे म्हणून मला ‘अ‍ॅमायकस’ नेमले, असेही लोक बोलत आहेत. हे प्रकरण कोणत्याही शंकेच्या वातावरणात चालावे किंवा माझ्यामुळे त्यावर सावट यावे, अशी माझी इच्छा नाही.

साळवे यांची विनंती मान्य करून त्यांना ‘अ‍ॅमायकस’च्या कामातूम मोकळे करताना सरन्यायाधीश त्यांना म्हणाले की, तुम्हाला किती वाईट वाटले असेल याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो. एक ज्येष्ठ वकील तुमच्याबद्दल काय बोलला तेही मी पाहिले. पण प्रत्येकाची आपापली मते असतात. न्या. बोबडे असेही म्हणाले की, यापुढे न्यायसंस्थेत मला काहीच स्थान असणार नाही. पण भविष्यात ‘अ‍ॅमायकस’नेमताना पूर्णपणे त्रयस्थ व्यक्ती शोधली जायला हवी, असे मला वाटते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button