ज्या सुनिल शेट्टींना सिनेमात हिरोईन मिळत नव्हती त्यांचं वार्षिक उत्पन्न आज १०० कोटींहून जास्त आहे!

Sunil Shetty - Maharashtra Today

बॉलीवूडमधल्या प्रमुख नावांपैकी एक नाव सुनिल शेट्टी (Sunil Shetty), सिनेमा जगताशी कसला ही संबंध नसताना त्यांनी या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. फक्त सिनेमा नाही तर व्यवसायातही त्यांनी मोठी मजल मारली आहे. एक काळ होता जेव्हा कोणत्याच बड्या अभिनेत्रीला त्यांच्यासोबत काम करायचं नव्हतं पंरतू वेळ अशी बदलली की मोठ मोठ्या अभिनेत्रींची इच्छा होती सुनिल शेट्टीनं आपल्यासोबत एका तरी सिनेमात काम करावं, सुनिल शेट्टींना लोक प्रेमाने ‘अण्णा’ या नावाने ओळखतात.

अभिनेत्र्या सुनिल शेट्टीसोबत काम करणं टाळायच्या

सुनिल शेट्टीचा जन्म कर्नाटकातल्या मेंगलोर जिल्ह्यात झाला. तिथून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पुर्ण केलं. त्यांचे वडील वीरप्पा शेट्टी यांनी मुंबईतील हॉटेलात वेटर काम करण्यापासून सुरुवात केली. नंतर त्यांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःचं हॉटेल उभारलं. सुनिल शेट्टींमध्ये असणारे व्यावसायिक गुण त्यांना वडीलांकडूनच मिळाले असतील असं मानलं जातं. शिक्षण पुर्ण केल्यानंतर सुनिल शेट्टी यांनी अभिनय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. त्यांना १९९२ च्या ‘बलवान’ सिनेमातून सिनेक्षेत्रात पाउल ठेवलं.

विशेष बाब अशी की त्यांच्यासोबत काम करायला कुणीच अभिनेत्री तयार होत नव्हती. सुनील शेट्टी हा बॉलीवुडमधला (Bollywood) नवखा चेहरा होता. त्यामुळं सिनेमा फ्लॉप होईल अशी भिती अभिनेत्रींच्या मनात होती. अनेक अभिनेत्र्यांनी सुनील शेट्टींसोबत काम करायला नकार दिला होता. शेवटी सुनिल शेट्टींनी सोबत काम करायला त्यावेळची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारती यांनी होकार दिला होता. सुनील शेट्टी यांचा पहिलाच सिनेमा हिट झाला. पुढं १९९४ ला आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटामुळं त्यांना प्रमुख अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळालं.

सोनालीला करायचं होतं सुनील शेट्टीसोबत लग्न

मोहरा हिट गेल्यानंतर सुनील शेट्टींसाठी एकापाठोपाठ एक सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. यानंतर सुनिल शेट्टी यांनी सनी देओळ आणि अजय देवगण यांच्या अॅक्शन चित्रपटांना पर्याय दिला. १९९७ साली त्यांनी ‘भाई’ चित्रपटात केलेल्या दमदार अभिनयामुळं प्रेक्षकांनी सुनिल शेट्टींना डोक्यावर घेतलं. या चित्रपटात त्यांच्यासोबत सोनाली बेंद्रे काम करत होत्या. दोघांच्य मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनी सपूत आणि कहर या सिनेमात काम केलं. सुनिल शेट्टींसोबत लग्न करण्याची सोनाली बेंद्रे यांची इच्छा होती परंतू त्यांच्या कुटुबींयांनी या लग्नाला संमती दिली नाही.

धडकन मधला देव प्रेक्षक अजून विसरले नाहीत

सुनिल शेट्टी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी २००० साली आलेल्या ‘धडकन’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटात त्यांनी देव नावच्या युवकाची भूमिका निभावली. एक प्रेमी आणि एक खलनायक अशी भूमिका निभवताना सुनिल शेट्टी दिसले. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. यानंतर त्यांनी कॉमेडी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘हेराफेरी,’ ‘आवारा पागल दिवाना,’ ‘हलचल,’ ‘चुप चुप के’ या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

तर दुसऱ्या बाजूला अनेक चित्रपटांमधून देशप्रेमाची भावना युवकांच्या मनात रुजवण्याच त्यांनी काम केलं. सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला. मधल्या काळात त्यांनी काम केलेले अनेक सिनेमे फ्लॉप झाले परंतू ते निराश झाले नाहीत. ‘रेड अलर्ट’ सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्करा मिळाला.

उद्योजक सुनिल शेट्टी

गेल्या काही दिवसांपासून सुनिल शेट्टी यांनी सिनेमाक्षेत्राकडं पाठ वळवली. परंतू आज त्यांच नाव भारताल्या यशस्वी उद्योजकांच्या यादीत घेतलं जातं. सुनिल शेट्टी आज अनेक हॉटेल्सचे मालक आहेत. फॅशन, बुटीक आणि सिनेमाच्या निर्मितीतून ते भरपूर पैसे कमवत आहेत. सुनिल शेट्टींचे वार्षिक उत्पन्न १०० कोटींच्या घरात असल्याचा दावा अनेक रिपोर्ट करतात. ‘पॉप कॉर्न मोशन पिक्चर्स’च्या माध्यमातून त्यांनी ‘खेल,’ ‘लुट,’ ‘भागमभाग’ आणि ‘रक्त’ या सिनेमांची निर्मिती केलीये. त्यांच्या पत्नीच्या नावावर ही भरपूर संपत्ती आहे. एनजीओच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. सध्या सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी बॉलीवुडमध्ये नशिब आजमावत आहे, तर मुलगा अहान सिनेमात येण्यासाठी तयारी करतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button