युती १०० टक्के होणार

BJP-Shivsena Alliance

badgeभाजप-शिवसेना युती अधांतरी असल्याच्या बातम्या चालवणे मीडियाने पुन्हा सुरु केले आहे. खास करून नाणार प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर युतीच्या भवितव्याच्या बातम्यांना जोर आला आहे. पण तुम्ही लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार आणि शंभर काय हजार टक्के होणार. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हे छान ठाऊक आहे. पण कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करण्यासाठी त्यांनाही अधूनमधून असले पिल्लू सोडावे लागते. मेट्रो रेल्वेसाठी कारशेडचा विषय हेही असलेच पिल्लू आहे.

येत्या निवडणुकीत जागावाटपाचे कुठलेही टेन्शन मुख्यमंत्र्यांवर नाही. टेन्शन असते तर महाजनदेश यात्रेच्या भानगडीत मुख्यमंत्री एवढे कशाला रमले असते. आज ह्या यात्रेचा नाशिकमध्ये समारोप आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा आहे. त्यातून सुटल्यानंतर मुख्यमंत्री जागावाटपाला हात घालतील. प्रथमच पूर्ण पाच वर्षे युतीत राहून स्थिर सरकार देण्याची ताकद ठेवणारा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रूपाने भाजपला मिळाला आहे. सरकारवर फडणवीस यांनी पक्की मांड बसवली आहे. आतली गोष्ट सांगू का? ह्या मुख्यमंत्र्याला युती हवी आहे. कारण त्यानेच ती जुळवून आणली आहे. आजच्या राजकारणात युतीशिवाय लढणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. पण भाजपमधल्याच काही महत्वाकांक्षी नेत्यांच्या मनात काही वेगळे आहे. म्हणून ते स्वबळाची स्टोरी चालवतात. पण मोठ्या मेहनतीने जुळवून आणलेला युतीचा डाव फडणवीस कुणाला उधळू देणार नाहीत. फालतू महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे काय झाले ते जाहीर आहे. त्यामुळे नाणार असो की आरे असो, काही गडबड होणार नाही. फडणवीस म्हणतील तेच होईल.

फडणवीस आणि उद्धव यांच्यात छान ट्युनिंग आहे. सेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावून फडणवीस यांनी ‘वाघांच्या प्रदेशा’त विश्वासार्हता कमावली आहे. राजकीय पक्ष म्हणून स्पर्धा असेल. पण पूर्वीसारखी काटछाट नाही. आदित्य ठाकरे यांना प्रोजेक्ट करण्याच्या चालीला मुख्यमंत्री ज्या सकारात्मक पद्धतीने सामोरे गेले, त्यातून युतीमध्ये निरामय वातावरण आहे. ‘आरे’ला कारे चालू राहील आणि युतीही चालू राहील. मुख्यमंत्री चाणक्य आहेत. भाजपला लढवायच्या तेवढ्या जागा ते मिळवतीलच. उद्धव यांना कशा प्रकारे हाताळायचे ते त्यांना उत्तम प्रकारे ठाऊक आहे. ह्या आठवड्यात जागावाटप आणि युतीची घोषणा सारे काही मार्गी लागलेले असेल.

ह्या मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतला तर काय होते याचे परिणाम दोन्ही काँग्रेसचे नेते भोगत आहेत. पानिपत कसे असते याची चव निकालाआधीच त्यांना चाखायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडे सर्वमान्य नेता नाही. अजितदादा सर्वांना चालतातच असे नाही. त्यामुळे वयाच्या ७८ व्या वर्षी शरद पवारांना मैदानात उतरावे लागत आहे. काँग्रेस अजूनही पराभवातून सावरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील निवडणूक असताना सोनिया गांधी किंवा प्रियांका यांना महाराष्ट्रात येऊन बसावे असे वाटत नाही. कारण पराभव त्यांनी केव्हाच गृहीत धरला आहे. कुणी कल्पना करणार नाही एवढ्या प्रचंड जागा जिंकून युतीचे अनभिषिक्त नेते फडणवीस पुन्हा एकदा येत आहेत.