शेतकर्‍यांचे दिल्लीतील आंदोलन शांततेत सुरु राहू दिले जावे

Supreme Court-Farmers
  • सुप्रीम कोर्टाची समिती नाताळाच्या सुटीनंतर

नवी दिल्ली: मोदी सरकारने (Modi Govt)केलेल्या तीन नव्या कृषीविषयक कायद्यांच्या विरोधात शेतकºयांच्या विविध संघटनांतर्फे दिल्ली राजधानी परिक्षेत्राच्या सीमेवर गेले तीन आठवडे सुरु असलेले आंदोलन, आंदोलक किंवा पोलीस यांच्याकडून शांततेचा भंग न होता, सुरु राहून दिले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सरकारला सांगितले.

या आंदोलनामुळे दिल्लीची नाकाबंदी झाल्यासारखी अवस्था होऊन महानगर परिक्षेत्रातील दोन कोटी लोकांचे दैनंदिन जीवन दुस्सह होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आंदोलकांना हटवून रस्ते मोकळे केले जावेत यासाठी राकेश वैष्णव व अन्य काही नागरिकांनी जनहित केली आहे. सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठापुढे दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.

शेतकºयांच्या सुरु असलेल्या आंदोलनात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करून खंडपीठाने म्हटले की, लोकशाहीमध्ये सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का लागणार नाही अशा प्रकारे बजावला जाऊ शकतो. जोपर्यंत हा हक्क अहिंसक पद्धतीने व इतरांच्या  जिवितवित्ताचे नुकसान न करता बजावला जात असेल तोपर्यंत त्यात अडथळा आणता येणार नाही.

आंदोलक शेतकर्‍यांशी सरकारने केकेल्या वाटाघाटींमधून काही ठोेस निष्पन्न होत नाही हे पाहून ही कोंडी फोडण्यासाठी त्रयस्थ मध्यस्थांची एक समिती नेमण्याचा विचार खंडपीठाने वारंवार बोलून दाखविला होता. त्यासाठी आंदोलक शेतकरी संघटनांना याचिकेत प्रतिवादी करून न्यायालयापुढे येण्याची नोटीसही पाठविण्यात आली. परंतु एक सोडून अन्य संघटना (कदाचित वेळेअभावी) आल्या नाहीत. त्यामुळे आता समिती स्थापनेसंबंधी नाताळाच्या सुटीनंतर केला जाईल. तोपर्यंत सर्व पक्षकारांनी समितीत कोण असावे याच्या सूचना करायच्या असल्यास त्या सादर कराव्यात, असेही खंडपीठाने नमूद केले.
या तिन्ही कृषि कायद्यांच्या वैधतेस आव्हान  देणार्‍या तीन .याचिकाही याच खंडपीठापुढे होत्या. परंतु कायद्याची वैधता नंतर तपासता येईल, असे म्हणून खंडपीठाने त्या याचिका यथावकाश सुनावणीस घेतल्या जातील, असे सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER