१३७ मजुरांच्या हातांवरील क्वारंटाईनचे शिक्के पाहून प्रशासनाची झोप उडाली

Workers - Home Quarantined Stamp

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून बिहारच्या मुझफ्फरपूरला विशेष श्रमिक एक्स्प्रेसने जाण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या हातांवर क्वारंटाईनचा शिक्का पाहताच प्रशासन हादरले. रेल्वेच्या सहा डब्यांमधील मजुरांची तपासणी केली जाते. तेव्हा लातूरहून आलेल्या १३७ मजुरांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के आढळले. प्रशासनाची झोप उडाली. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर तिढा सुटला. लातूरला येणाऱ्या आणि तेथून बाहेर जाणाऱ्या मजुरांमध्ये घोळ झाल्याने बिहारकडे पाठवण्यात येणाऱ्या मजुरांच्या हातांवर चुकून क्वाॅरंटाइनचे शिक्के मारले गेले. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १३७ मजुरांसंबंधी ‘दे आर हेल्दी, नाऊ कॅन ट्रॅव्हल’ असे प्रमाणपत्र व्हाॅट्सअॅपवर पाठवल्यानंतर सर्वांना रेल्वेत बसवण्यात आले आणि मजुरांना घेऊन रेल्वे मार्गस्थ झाली.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून शनिवारी (२३ मे) दहावी विशेष श्रमिक एक्स्प्रेस मुझफ्फरपूरला जाण्यासाठी सकाळी ७ वाजता रेल्वेस्थानकावर येऊन थांबली होती. रेल्वे सकाळी १० वाजता स्थलांतरित मजुरांना घेऊन बिहारकडे निघणार होती. मजुरांना रेल्वेत बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुझफ्फरपूरला जाणारी रेल्वे शिवान, हाजीपूर, छप्रामार्गे जाणार होती. मराठवाड्यातील गेवराई, केज, फुलंब्री, अंबाजोगाई, परंडा, माजलगाव, उमरगा, लातूर, उस्मानाबाद, वाळूज, गंगापूर, कांचनवाडी, औरंगाबाद आदी ठिकाणांहून मजूर आले होते. थर्मल स्क्रीनिंग करत असताना डॉक्टरांना एका मजुराच्या हातावर शिक्का मारल्याचे निदर्शनास आले.

अधिकारी झाले अवाक्

हातावर २२ मे रोजीचा शिक्का बघितल्यावर संबंधित मजुराला त्यासंबंधी विचारणा केली असता आम्हाला लातूर येथे प्रवासास निघण्यापूर्वी शिक्के मारल्याचे तो म्हणाला. असे शिक्के किती जणांच्या हातावर आहेत, अशी विचारणा करताच मजुराचे उत्तर ऐकून रेल्वेस्थानकावरील सर्व प्रशासकीय अधिकारी अवाक् झाले. शंभरावर मजुरांना शिक्के मारले असल्याचे समजताच मजुरांना गाडीत बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली. रेल्वेच्या सहा डब्यांमध्ये तोपर्यंत प्रवाशांना बसवण्यात आले होते. रेल्वे सुरक्षा दल, जीआरपी, रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलिस यांच्या मदतीने सर्वांची तपासणी करण्यात आली. शिक्का हातावर असलेल्यांना एका बाजूला बसवण्यात आले होते.

तिढा सुटला : रेल्वेस्थानकावर औरंगाबादचे पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार किशोर देशमुख, औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे विशेष व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट सी. पी. मिर्था, पोलिस निरीक्षक अरविंद शर्मा, वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींनी त्वरित यंत्रणा हलवली. दरम्यानच्या काळात ज्यांच्याकडे फिटनेस प्रमाणपत्र व प्रवासाच्या परवानगीचे प्रमाणपत्र आहे अशांची स्क्रीनिंग करून रेल्वेत बसवण्याची प्रक्रिया सुरू होती. लातूर व उस्मानाबाद येथे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने तेथील प्रशासनास क्वाॅरंटाइनसंबंधीची प्रक्रिया अवगत नसल्याचे निदर्शनास आले. लातूरला इनवर्ड आणि आऊटवर्ड मजुरांमध्ये गफलत झाल्याने चुकीने फिटनेस प्रमाणपत्र असताना १३७ मजुरांना बिहारकडे पाठवताना शिक्के मारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. औरंगाबादच्या जिल्हा प्रशासनामार्फत लातूरच्या जिल्हा प्रशासनाशी व वैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा ही बाब स्पष्ट झाली. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झालेली चूक लक्षात आल्याचे सांगून व्हॉट्सअपवर संदेश पाठवला. यानंतर संबंधित १३७ मजुरांना तिकीट देण्यास सुरुवात झाली. अवघ्या दहा मिनिटांत त्यांना रेल्वेत बसवण्यात आले.

पोलिस उपायुक्त खाटमोडेंची माणुसकी : आजवर ऐनवेळी आलेल्या प्रवाशांना गाडीत सामावून घेतले. शनिवारी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्याची व्यवस्थापक जाखडे यांनी सूचना केल्यानंतर पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी तीन मजूर येताहेत, तोपर्यंत गाडीला हिरवी झेंडी देऊ नका, असे सांगितले. सातारा परिसरात बिहारचे तीन मजूर अडकले होते. त्यांच्यासाठी रेल्वेस्थानकावर उभी असलेली भारतीय जैन संघटनेची रुग्णवाहिका पाठवली. १५ मिनिटांत रुग्णवाहिका तिघांना घेऊन आली. त्यांना तिकीट दिल्यानंतर गाडी रवाना झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER