
बॉलिवूडमध्ये (Bollywood) एखाद्या कलाकाराला काही सिनेमे ऑफर होतात. पण काही कारणांमुळे ते कलाकार ते सिनेमे करीत नाहीत. आणि नंतर ते सिनेमे सुपरहिट झाले. अशा अनेक घटना घडल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हाने (Shatrughan Sinha) काही दिवसांपूर्वी त्याला ऑफर झालेले सिनेमे त्याने न केल्याने अमिताभ बच्चन यांनी कसे केले आणि तो हिट झाला याची माहिती दिली होती. आमिर खान, शाहरुख खानसह ऐश्वर्या, राणी मुखर्जीपर्यंत अनेक नायिकांसोबतही अशा घटना घडलेल्या आहेत. काही अभिनेत्री सिनेमात बोल्ड सीन किंवा किसिंग सीन करणार नाहीत असा निश्चय करून बॉलिवूडमध्ये काम करीत असतात. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकदा त्यांच्या हातातून चांगले सिनेमे निघून जातात आणि नंतर तो सिनेमा सुपरहिट झाल्याचे त्यांना पाहावे लागते.
अशाच एका अभिनेत्रीने राज कपूरचा महत्त्वाकांक्षी सिनेमा ‘राम तेरी गंगा मैली’ हा केवळ त्यात नायकासोबत किसिंग सीन असल्याने नाकारला होता. स्वतः या अभिनेत्रीनेच ही माहिती प्रथमच उघड केली आहे. ही अभिनेत्री आहे पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure). ८० च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरे अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय नायिका होती. बॉलिवूडमधील जवळ जवळ सर्व मोठ्या निर्माते आणि कलाकारांसोबत तिने काम केलेले आहे. पद्मिनीचे असे अनेक सिनेमे आहेत जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेले आहेत. याच पद्मिनीला राज कपूर (Raj Kapoor) यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ची ऑफर दिली होती.
याबाबत बोलताना पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले, राज कपूर यांनी मंदाकिनीसोबत (Mandakini) ‘राम तेरी गंगा मैली’ सुरू केला होता. मंदाकिनीने जवळ जवळ ४५ दिवसांचे शूटिंग केले होते. तरीही राज कपूर यांनी मला या सिनेमाची ऑफर दिली. मंदाकिनीचे सगळे शूटिंग रद्द करून पुन्हा नव्याने शूटिंग करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. पण या सिनेमात नायक राजीव कपूरसोबत किसिंग सीन असल्याने मी त्याला नकार दिला होता आणि राज कपूर यांनाही ही गोष्ट चांगली ठाऊक होती. नायक राजीव कपूरच नव्हे तर सिनेमात कोणत्याही नायकासोबत मी किसिंग सीन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच मी तो सिनेमा नाकारला होता. एवढेच नव्हे तर मला ‘एक दूजे के लिए’मधील रती अग्निहोत्रीचा ‘सिलसिला’मधील रेखाचा, ‘तोहफा’मधील श्रीदेवीचा रोलही ऑफर झाला होता. पण काही कारणांमुळे मी ते सिनेमे करू शकले नव्हते. तुम्ही प्रत्येक सिनेमात काम करू शकत नाही. तुम्ही सोडलेला एखादा सिनेमा हिट झाला की वाटते की या सिनेमात आपण असायला हवे होते. पण ठीक आहे.
पद्मिनी कोल्हापुरेच्या ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमाबाबतच्या वक्तव्याने बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
ही बातमी पण वाचा : कोरोनामुळे ऐश्वर्याच्या नव्या सिनेमाचे शूटिंग झाले रद्द
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला