18 वर्षात अडीच लाखांपेक्षा जास्त कँसरपीडित मुलांना मदत केलीय या अभिनेत्याने

Vivek Oberoi

बॉलिवूडचे कलाकार जशी जमेल तशी समाजसेवा करीत असतात. काही जण कसलाही प्रचार न करता आपले काम करीत असतात तर काही जण करतात नखभर आणि दाखवतात हातभर. अमिताभ, जॉनी लिव्हर, अजय देवगण, विवेक ओबेरॉय हे असे काही कलाकार आहेत जे समाजाप्रती असलेले त्यांचे देणे पूर्ण करीत असतात पण त्याचा प्रचार करीत नाहीत. याबाबत अमिताभशी बोलताना त्याने सांगितले होते. आम्ही मदत करतो ती आमची प्रसिद्धी व्हावी म्हणून करीत नाही तर खरोखर गरजूंना मदत व्हावी म्हणून करतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मदत करीत असतात. अमिताभचे ते म्हणणे 100 टक्के खरे आहे. विवेक ओबेरॉयही (Vivek Oberoi) असाच कलाकार आहे जो समाजसेवा करीत असतो पण त्याने त्याचा कधी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उपयोग केला नाही. विवेकने गेल्या 18 वर्षात जवळ जवळ अडीच लाखांपेक्षा जास्त कँसरपीडित मुलांना उपचारासाठी आर्थिक मदत केलेली आहे.

संपूर्ण जगात कँसरने थैमान घातलेले असून सगळ्यात जास्त मृत्यू विविध प्रकारच्या कँसरमुळेच होतात. यात अगदी छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचा समावेश आहे. विवेकने 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2004 मध्ये कँसर पेशंट्स अँड एसोसिएशन (CPAA) ने त्याला एका कार्यक्रमाला बोलावले होते. हा कार्यक्रम होता कँसर पीडित मुलांसोबत वेळ घालवण्याचा. विवेकचा 3 सप्टेंबरला वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने CPAA ने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कँसर पीडित मुलांना भेटून आणि त्यांच्याशी गप्पा मारून विवेक खूपच प्रभावित झाला होता. ती मुलेही विवेकला पाहून आनंदी झाली होती. या मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विवेकने कँसरमधून बरे झालेल्यांना कार्यक्रमाला बोलावले होते आणि त्यांचे अनुभव कँसरपीडित मुलांबरोबर शेअर करण्यास सांगितले होते. बरे झालेल्यांचे बोल ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर कंसरला हरवण्याची जिद्द दिसू लागली होती.

त्यानंतर विवेकने कँसर पीडित मुलांसोबतच वाढदिवस साजरा करण्याचा नियम केला होता. अजूनही तो हे काम करीत आहे. कँसर उपचारावरील क्रमांक एकचे हॉस्पिटल असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर कँसरपीडितांचे नातेवाईक फुटपाथवर राहातात, CPAA च्या सोबत काम करीत असताना विवेकने त्या सगळ्यांसाठी राहाण्याची सोय केली आहे. तसेच उपचारासाठी आर्थिक मदतही तो देत असतो. डॉक्टरांशी बोलून स्वस्त दरात उपचार आणि औषध कंपन्यांशी बोलून स्वस्त दरात औषधे मिळवून देण्याचाही प्रयत्न विवेक करीत असतो. एवढेच नव्हे तर ज्या गरीबांनी उपचारासाठी जमीन, घर गहाण ठेवले आहे त्यासाठीही मदत करतो आणि घर, जमीन मिळवून देतो.

विवेक म्हणतो, देवाने कोणालाही कँसर होऊ देऊ नये. गरीब मुलांना कँसर झाल्यानंतर त्याचे आई-वडिल खचून जातात. जवळ पैसा नसल्याने उपचारही करू शकत नाहीत. मी माझ्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढी करतो पण ती पुरेशी नाही हे मला चांगले ठाऊक आहे. या मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना मदत करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. समाजातील अन्य लोकांनीही या मुलांना मदत करण्यास पुढे आले पाहिजे असेही विवेकने बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER