The ability to change our life…!

Law Of Attraction

“लॉ ऑफ अट्रॅक्शन” (Law Of Attraction) आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेला एक कळीचा सिद्धांत आहे .गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा जसा वैश्विक आणि खूप पॉवरफुल सिद्धांत आहे ,त्याच प्रमाणे हा सुद्धा सतत कार्यरत असणारा, आपल्या प्रत्येक हालचालीत उमटणारा, प्रत्येक क्षणाला अस्तित्वात असणारा असा आकर्षणाचा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही आयुष्यात ज्यावर फोकस करता ते तुमच्याजवळ आणून देण्याचे कार्य हा करतो. तुमची उर्जा किंवा तुमचे लक्ष ज्यावर खर्च करता तेच परत वापस येते .म्हणजे आपण सकारात्मक किंवा चांगल्या गोष्टी मनात आणल्या तर तशाच गोष्टी घडतील ! होतील !! जाणून येतील!!! पूर्वी आपले पूर्वज नेहमी सगळ्या लहान मुलांना सांगायचे की, घरात वाईट साईट बोलू नये. वास्तु तथास्तु म्हणते. या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ! थोडक्यात Dr. Robert Schuller म्हणतात त्याप्रमाणे,” यू आर व्हॉट डू यु थिंक अबाऊट ऑल डे लाँग .”

हा विचारांच्या आकर्षणाचा नियम आहे.

जेव्हा आपण कुठलाही विचार करतो , तेव्हा त्यापासून काही लहरी, वाइब्रेशनस् निर्माण होतात, आणि ती पुरेशी साठली की त्या प्रमाणे कृती घडते, तो विचार प्रत्यक्षात येतो. बरेचदा वाईट विचार लवकर अस्तित्वात येतात असं लोकं म्हणतात. परंतु प्रकृतीला चांगलं वाईट असं काही कळत नाही. ज्याची काळजी आपल्याला लागून राहिलेली असते, ती गोष्ट तशीही आपल्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसत असते, एवढंच काय मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात.

जसे की आत्ताच या काळामध्ये मला कोरोना होणार तर नाही ? झाला तर ऑक्सिजन वेळ मिळेल का ? माझ्या जवळच्या नातलगांना काही होणार नाही ना ? कुणी लोक इतके वेळा हात धुतात की कधीतरी त्याचं रूपांतर मानसिक आजारात ही होऊ शकतो. त्याच त्या टीव्हीवरल्या बातम्या ,पेपर मधल्या न्यूज हे सगळं बघून आणि ऐकून, मनावर एक प्रकारचा चिंता काळजी आणि निराशा याचा सावट आलेलं आहे. आणि मनात कायम तेच विचार जर घोळत राहिले तर या लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे नसलेल्या गोष्टी आपण आपल्याकडे ओढवून घेत असतो.

मग अशी सगळी व्हायब्रेशन्स आपल्या ओरांमध्ये निर्माण होत रहातात आणि तिथे साठून राहतात, ही वातावरणातील व्हायब्रेशन्स पुरेशी गोळा झाली की फलद्रूप होतात. म्हणजे कुठल्याही विचाराशिवाय कृती घडू शकत नाही. प्रत्येक विचार ,उच्चार अशा गोष्टींमधून त्या त्या गोष्टी निर्माण होतात. बरेचदा काही घरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं किंवा काही घरांमध्ये मात्र इतकं अस्वस्थ होतं की तिथे आपण फार काळ राहू शकत नाही. त्या घरांमध्ये कायम जर वादविवाद संघर्ष दुःख याचे विचार साठत असतील तर ? तर तिथे निगेटिव्ह एनर्जी च असणार !

कुठल्याही आजाराचं बघा , उदाहरणार्थ कॅन्सर. आजकाल चांगल्या प्रभावी औषधांमुळे तो बराही होईल. परंतु तो परत उद्भवतो. तो का बरं? या आजाराविषयी ची भीती, काळजी ,चिंता आणि तो आजार जोपर्यंत मनातून जाणार नाही, तोपर्यंत तो शरीरातून नाही निघून जाणार नाही.

म्हणजेच प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी निर्माण करत असतो की जे वास्तव असतं. आपल्या भविष्य काळातील सगळ्या गोष्टी आपल्या एकेका विचारांमधून निर्माण होत असतात. तुम्हाला जर प्रेम आणि आनंद हवा असेल तर तुम्हाला तोच विचार करावा लागेल, तोच विचार पेरावा लागेल. याचा विचार करताना एक उदाहरण देता येईल. रेडिओवरील वेहव्हजचे प्रसारण आणि स्वीकार जसा होतो तीच गोष्ट इथे होते. म्हणजे तुम्हाला जे स्टेशन लावायचे आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या रेडिओवरील फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी लागते. तेव्हाच आपल्याला हवा तो प्रोग्राम ऐकता येतो.

लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी आपल्याला आपल्या भावना आणि विचार मॅनेज कराव्या लागतात.

आपण आयुष्यात नकळत, सहजगत्या प्रतिक्रिया देत असतो. पण जर आपल्याला कोणी अयोग्य रीतीने वागविले, तर आपली रिएक्शन ऑटोमॅटिकली वाईट जाईल .आपण रागवू .निराश होऊ. अपसेट होवू. आणि अशा घटनेत निर्माण होणारी रिएक्शन निगेटिव्ह असेल. पण आपल्याला तर याच्यातून सकारात्मक आउट कम हवं आहे. मग काय करायचं तर जो प्रतिसाद आहे तो जाणीवपूर्वक वेगळा आणि सकारात्मक मार्गाने जायला हवा.

मग जी व्यक्ती, घटना ,कुटुंब यांच्याकडून आपल्याला त्रास झाला असेल, त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्तीमध्ये जे काही चांगलं असेल तर ते आठवण्याचा प्रयत्न करा. यापलीकडे जाऊन त्या व्यक्तीला जे काही हवं ते तिला मिळू दे अशी प्रार्थना करा. बरेचदा अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा परस्परांचे स्वभाव भिन्न असतील. पण तरीही परस्परांचा रिस्पेक्ट तर आपण करू शकतो.

एवढेच नाही तर आपल्या मानवी शरीरातील संपूर्ण पेशींमधून एक ऊर्जा ( Energy) भरलेली आहे, प्रत्येकाच्या ! ती निर्माण केल्या जात नाही आणि ती नाहीशी पण होत नाही. आणि ही ऊर्जा आपल्या विचारांवर आधारित कार्य करते. अगदी दररोजच्या परिचयातले उदाहरण बघा. आपण एखाद्या व्यक्तीची मनात आठवण करतो. फोन करायला जमत नाही पण त्याच व्यक्तीचा संध्याकाळी फोन येतो आणि आपण आश्चर्यचकित होऊन म्हणतो, “अरे !आजच सकाळी तर आपण आठवण काढली होती. ” त्याचवेळी आपण त्या व्यक्तीचे लक्ष आपल्याला फोन करण्यास आपण वेधून घेतलेलं असतं. आपले विचार काळ ,अंतराळातून अत्यंत गतिमानतेने जाऊन त्या व्यक्तीच्या विचारांना पर्यंत जाऊन पोहोचतात. आणि कदाचित या तुमच्या विचाराने, त्याला तुम्हाला फोन करण्यास उद्युक्त केलं. आणि ह्याची प्रचिती आपण सगळे जण येत असतो.

आपण म्हणजे एक सजीव चुंबक किंवा मॅग्नेट आहोत म्हणा ना. त्यामुळे तुम्ही लोक, साधन, पैसा कल्पना धोरण आणि परिस्थिती ही तुम्हाला पाहिजे तशी निर्माण करून स्वप्ने पूर्ण करू शकतात.

” All that we are is the result of what we have thought.” — Buddha

मग काय करावं लागेल ? तर विचार बदला ,आयुष्य बदलेल !

फक्त आपल्याला काय हवं आहे त्या विचारांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. उदाहरणार्थ आपण एखाद्या दुकानात गेलो आणि एक किलो तांदूळ मागितला. दुकानदार ते मोजतोय, त्याचवेळी आपण आपण मटकी, तूर ,डाळ ,ज्वारी, मूग, हरभरा अशी मध्येमध्ये इतर धान्यही सांगत गेलो. आणि घरी आलो. बघितलं कारण आपल्याला भात करायचा आहे. परंतु तिथे तांदूळ नाहीच, तर हे असं सगळं मिश्र धान्य. त्याच प्रमाणे आपल्याला जर एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्याचवेळी एक मन म्हणत हे हवं हे हवे, दुसरं मन म्हणत ते नको. आणि मग आपल्याला नेमकं जे हवं आहे ते मिळतच नाही. म्हणून त्याच्यावर पूर्ण फोकस हवा जे आपल्याला हवें आहे.

आता बघूया की मनातली भीती कशी घालवायची ? भित्यापाठीमागे ब्रह्मराक्षस नेहमीच म्हणतात. आणि सध्याच्या परिस्थिती तर सोशल मीडियाने जो काही सनसनाटी बातम्यांचा हाहाकार माजवला आहे, त्यामुळे एक विचित्र भीती सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण झालेली आहे. काही लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येतात आहे. आपले अगदी निकटचे जिवलगही बरेच जणांना गमवावे लागले. मुलांच्या शाळा, त्यांची करियर सगळीच अनिश्चितेने ग्रासून गेली. काहींच्या नोकरीवर गदा आली. म्हणूनच काय करायचं आहे ?तर अशा बातम्या मुळीच ऐकू नका आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करत राहा. जो व्यक्ती गेला त्यांना सद्गती द्या अशी प्रार्थना करा. भयभित् होऊ नका. जुने अल्बम बघणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, चांगली पुस्तक, चांगली गाणी, काही छान व्हिडिओ ऐका बघा.

मुख्य म्हणजे जेव्हा हा आपल्या मनात भीती,ताण येतो ,अशा वेळी ह्या भीतीला व्यक्त करता आलं तर ती हळूहळू निघून जाते , पण प्रत्येक वेळी आपल्याला व्यक्त करण्याला कोणी मिळेलच असं नाही. त्यासाठी डायरी रायटिंग हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.

पण त्याचबरोबर त्यावेळी आपल्या शरीरात जी सात चक्र असतात ,त्यापैकी अनाहत चक्र जे आपल्या हृदयस्थानी असतं त्यावर दाब पडतो. आणि मग तो दाब इतर कुठल्याही अवयवांवर प्रेशर आणतो, असं आयुर्वेद सांगतं. मग आपल्या बोटांच्या अग्रांनी हृदय स्थानी अलगद टॅपिंग करायचं. हळूहळू तो ताण ,ती भीती या टॅपिंग द्वारे आपण काढून टाकू शकतो. हे करत असताना सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचा आणि नंतर एका लयीमध्ये व्यवस्थित श्वासोच्छ्वास चालू ठेवायचा, आणि म्हणायचं सगळं नीट होणार आहे, हे ही दिवस जातील, त्याचवेळी एखादी चांगली सकारात्मक बातमी किंवा गोष्ट आठवायची.

यावेळी आपल्याला ज्या गोष्टी हव्याश्या वाटतात आहे ,आकर्षित करायचे आहेत अशा गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. बरेचदा आपण आपल्या प्रार्थना या नकारात्मक पद्धतीने करत असतो आणि ती अत्यंत वाईट सवय आहे. नकारात्मक शब्दांचा भाषेचा वापर अजिबात करू नका. प्रत्येक विचार ,प्रत्येक शब्द आपण बोलत असलेला हा विश्वाला एक संदेश पाठवतो आहे. आणि म्हणूनच तुम्ही सतत ,भविष्यातील तुम्हाला जे काय अनुभव हवे आहेत त्यासंबंधीची ऑर्डर तुम्ही यावेळी वैश्विक शक्तीकडे देऊ शकता. नकारात्मक मॅसेज आहेत, त्याचं रूपांतर सकारात्मक मेसेज मध्ये कसे करता येईल याची थोडी उदाहरणे बघू.

* I don’t want to be late — नकारात्मक
* I want to be on time. — सकारात्मक.
* I don’t want to forget. — नकारात्मक
*. I want to remember . — सकारात्मक.
*आवाज करू नका शांत बसा — ऐवजी * कृपया थोडं शांत रहा.
*तुझी खोली अतिशय अस्वच्छ, पसरलेली आहे — ऐवजी * कृपया तुझी खोली स्वच्छ ठेव.

थोडक्यात आपण विचार ,दृश्य , ऊर्जा जी आपल्याला नको आहे तिचा विचारच नको.

म्हणूनच फ्रेंड्स ! सध्य स्थिती मध्ये दररोज सगळं कसं छान झाल आहे, सगळ्यांना निरामय आरोग्य मिळालेल आहे, जनजीवन सुरळीत झालेले आहे, सगळ्यांची रुटीन व्यवस्थित सुरू झालेत, म्हणजे थोडक्यात जो जे वांछील तो ते लाहो ! हे दररोज visualise करायचं आहे, हे दृश्य डोळ्यासमोर आणायचं आहे. प्रत्येकाच्या मनात एक उजळलेला जो दिवा आहे, ज्याला सध्या काजळी आलेली आहे. जी ऊर्जा आहे, त्यावरची काजळी झटकून “अंतरीचा दिवा “परत तेजस्वी करायचा आहे प्रज्वलित करायचा आहे. आणि ती शक्ती ,प्रत्येक व्यक्ती मध्ये आहे. ती आपले जीवन बदलवण्याची क्षमता परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button