
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओची चोरी झालीच नव्हती, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही स्कॉर्पिओ (Scorpio) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडेच (Sachin Vaze) होती!ती चोरीला गेल्याची खोटी तक्रार करायला सांगितल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वाझेंनी हे सर्व का?, कशासाठी? आणि कुणाच्या इशाऱ्यावर केलं? याचे गूढ अजून उलगडले नाही.
कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा एनआयएला (NIA) संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतले, असे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांच्या ऑफिशियल वापरासाठी हे डीव्हीआर पाहिजेत, असे सांगून वाझेंनी सोसायटीकडून सीसीटीव्ही फुटेज घेतले होते. त्यानंतर हे फुटेज डॅमेज केले. चौकशीत कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी हे केले. सीसीटीव्ही फुटेज मिळावे म्हणून वाझेंनी त्यांच्या एका मित्राच्या नावाने सोसायटीला पत्र दिले होते. हे पत्रं एनआयएच्या हाती आले आहे. अंबानी प्रकरणाच्या चौकशीसाठी हे फुटेज हवे आहे, असे पत्रात म्हटले आहे व त्यावर वाझेंचे हस्ताक्षर आहे, असे सूत्रांनी सांगितले.
वकिलाचे आरोप
वाझे याना २५ मार्चपर्यंत एनआयएची कोठडी मिळाली आहे. वाझेंना १२ तास बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप वाझेंच्या वकिलांनी केला आहे. वाझेंना रविवारी अटक केली आणि सोमवारी कोर्टात सादर करण्यात आले. कुटुंबातील सदस्य आणि वकिलांनाही वाझेंना भेटू दिले नाही. वाझेंना फोन करण्याची परवानगीही देण्यात येत नाही. वाझेंच्या कुटुंबीयांना वाझेंच्या अटकेची अधिकृत माहितीही देण्यात आली नव्हती, असा आरोपही करण्यात आला आहे. वाझे यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले
एनआयएच्या तपासात वाझेंनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याचं उघड झाले आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर नष्ट करण्याचा प्रयत्नही वाझेंनी केल्याचे लक्षात आले आहे. हे सर्व डीव्हीआर वाझेंकडे होते आणि त्यातील अनेक डीव्हीआर डॅमेज झालेले आहेत. वाझे स्वतः बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानात गेले होते. त्यांनीच स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारच्या बोगस नंबर प्लेट तयार केले. स्कॉर्पिओला एका स्कूटरची नंबर प्लेट लावण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला