त्या अधिकाऱ्याला यायचे होते घोड्यावरून ऑफिसला, काय झाले?

nanded

नांदेड शहरात एक अजबगजब प्रकार घडला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयात चक्क घोड्याने येण्याची आणि हा घोडा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यासाठी जागेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव आहे, सतीश पंजाबराव देशमुख. ते रोजगार हमी योजना कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी सकाळी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक अर्ज दिला. मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे. त्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी आता घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात येणे मला शक्य होईल.

मी घोड्याने येईल तेव्हा मला घोडा बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात परवानगी द्यावी, असे सतीश देशमुख यांनी या अर्जात म्हटले आहे. सोशल मीडियात दुपारीच हे पत्र प्रचंड व्हायरल झाले. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. आता जिल्हाधिकारी हे देशमुख यांना घोडा बांधण्यासाठी जागा देतील का, दिलीच तर त्यात काय काय अटी शर्थी असतील याविषयी तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले. घोडा हा पराक्रमी प्राणी मानला जातो. जगातील अनेक लढायांमध्ये घोड्यांचा वापर झाला आणि त्यांनी त्यांच्या मालकांना प्राणपणाने साथ दिली यासंबंधीच्या अनेक कथा आहेत. महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा तर इतिहासप्रसिद्ध आहे.

अलीकडच्या काळात ओझे वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर होतो किंवा लग्नामध्ये नवरदेवाला मारुतीचे दर्शन करून आणण्यापर्यंत घोड्यावर वाजतगाजत नेले जाते. काही वेळा हा घोडा उधळला गेला आणि नवरदेव जमिनीवर आपटला असेही बघायला मिळते. मात्र, आता सतीश देशमुख यांनी चक्क घोड्याने कार्यालयात जाण्याचे ठरविल्याने जिल्हाधिकारी त्यांना खरेच आपल्या कार्यालय परिसरात घोडा उभा करण्यासाठी पार्किंंग स्पेस देतात की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दुचाकीवर बसल्याने पाठदुखीचा त्रास होतो आणि घोड्यावर बसल्याने मात्र होत नाही हा तर्क देशमुख यांनी कुठून आणला हे समजायला मार्ग नाही.

कदाचित पेट्रोलचे दर खूपच वाढल्याने पाठदुखीचा बहाणा करून ते घोड्याने येत असावेत असा चिमटा नेटकऱ्यांनी काढला. माहिती अशी आहे की, या अशा अर्जाबाबत वरिष्ठांनी देशमुख यांची चांगलीच कानउघाडणी केल्याने त्यांनी आधी दिलेले पत्र मागे घेतले. मी याआधी दिलेला अर्ज मागे घेत आहे, असे पत्र त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि या विषयावर पडदा पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER