तो साक्षात्कारी क्षण !

That interview moment

“आपण लवकरच जाणार अशा गृहीतकात दिवस काढतोय, पण समजा आणखीन पंचवीस वर्ष जिवंतच राहिलो तर ? मृत्यूच्या भेटीत आणि निरर्थकपणात बुडून आयुष्य उगीचच वाया गेलं असं मरताना वाटलं तर ? तेव्हा हातात काहीच नसेल.” या विचारानंतर अनघा, प्रत्येक क्षण जाणिवेनं जगणं म्हणजे काय ते मला लख्ख उलगडलं ग !,” मीरा सांगत होती.

मीराच्या शस्त्रक्रियेला महिना उलटून गेलेला होता. तिला भेटायला जायचचं अस अनघाने पक्क केलं. कारण” मी ठीक होईपर्यंत कोणी भेटायला येऊ नका बर का !” हे मीराने सगळ्यांना सांगून टाकलं होतं. कशी आहेस !असे विचारताच ,”छान आहे , बॅक टू लाइफ” असं मीरा म्हणाली. अगं ते काळजी चे संवाद नकोसे वाटत होते मला . शिवाय नवरा आणि मुलगा आणि आई-बाबा सोबत होतेच आणि आणखीनही होती, कुणाचीतरी सोबत .तेच सांगते तुला ! असं म्हणून मिराने तिचा तो अनुभव सांगितला.

मीराला ज्यादिवशी शंका आली त्या दिवशी ती स्वतःच चेकअप साठी गेली आणि सोनोग्राफी बायोप्सी करून आली. टेन्शन होतं, पण आईला टेन्शन नको म्हणून सांगितलं नाही. तिची आई त्या वेळी चिकन सूप या मालिकेतील पुस्तक वाचत होती .तिने इच्छा नसतानाही मीराला पुस्तक वाचाय चा आग्रह केला. मीराने एक पान उघडून जेव्हा बघितलं तेव्हा नेमकं तिला सुझन नावाच्या एका स्त्रीला झालेल्या कॅन्सरच्या शस्त्रक्रियेत ची गोष्ट उघडली गेली, त्यात मार्गारेट नावाची रात्रपाळी ची नर्स. सुझनच्या अलगदपणे रिकाम्या झालेल्या जागेवर हात ठेवून सुझनच्या मनातल्या भावना कशा समजून घेते आणि सुझान त्या अवयवाला कसा छान निरोप देते हे तिने वाचलं.

मीरा पुढे म्हणाली की ,ती शस्त्रक्रियेच्या आदल्याच दिवशी खोलीत एकटीच बसली आणि उद्या आपला एक सुंदर अवयव आपल्या शरीराला कायमचा अपूर्ण करून जाणार आहे, त्यामुळे त्याला तिरस्कार करून चालणार नाही तर आभार मानायला हवे .आणि प्रेमाने निरोप द्यायला हवा असं वाटून ती आरशासमोर उभं राहिली आणि ,आभार आणि निरोपाचा एक अबोल संवाद तिने कसा केला हे मिरा ने सांगितले.

एखादा अवघड प्रसंग तुम्ही कल्पनेत तीव्रपणे जगलात तर प्रत्यक्षात त्याची धार बोथट होऊ शकते. तसंच योगायोगाने तिच्या घडलं होतं. अनघा म्हणाली,” मनाच्या शक्तीची जादू अनुभवलीस तू !एवढ्या जीवघेण्या आजारपणात ही जाणीव जागी ठेवता आली म्हणून श्रीमंत झालीस तू ! किती विलक्षण अंतर्ज्ञान ! “आनंदाने थक्क होत अनघाने मीरा चा हात आपल्या हातात घेऊन त्यावर हात ठेवला.” अगं! तुम्हाला सगळ्यांना माझी हिम्मत दिसली, पण ती मला दिलेली होती सुझन आणि मार्गारेट ने ! त्याशिवाय माझ्या मनाची अशी तयारी झाली नसती.”

फ्रेंडस ! मिराचे अनुभव खरंच पटणारे आहे. सगळे जिवलग सोबत असताना देखील ,ती घालमेल जपलेल्या व्यक्तीच्या संवादाची सोबत किंवा ताकद वेगळीच असते.

म्हणूनच सध्याच्या कोरोना काळामध्ये मी अनुभवलेल्या अशाच एका प्रसंगाची आठवण तुम्हाला सांगते. असाच एक साक्षात्कारी क्षण होता तो !

मागच्या वर्षीची गोष्ट ! मी स्वतः माझ्या भावाकडच्या लग्नाला गेले होते, आम्हा दोघा बहिणींना एकच भाऊ आणि त्याच्या मुलाचे लग्न. त्यामुळे खूप उत्साहात होते. अकोल्याहून वरात मुंबईला गेली. लग्न सुंदर पार पडलं. परत आल्यानंतर रिसेप्शन झालं. आणि रिसेप्शनच्या दिवशी मला दुपारी टेंपरेचर आल. पण उत्साह ओसरला नव्हता. त्यामुळे क्रोसिन घेऊन रिसेप्शनसाठी ठरवलेली साडी नेसून ,तयार होऊन मी तेही एंजॉय केलं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र न थांबता परत घरी आलो. दोन-तीन दिवस टेंपरेचर उतरत नव्हतं .म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरनी चेस्टस्पेशालिस्ट कडे पाठवल. त्यांनी चेक केलं आणि लगेच ऍडमिटचं केलं. ऑक्सीजनची लेव्हल अत्यंत कमी झाली होती. त्यानंतर सतत आठ दिवस ऑक्सिजन काढून चालत नव्हतं. वेगवेगळ्या चाचण्या होत होत्या. निदान होत नव्हतं. माझा प्रचंड खोकला पाहून डॉक्टर पण हबकले होते. T. B, कॅन्सर या सारख्या सगळ्या टेस्ट झाल्या. सुदैवाने त्या निगेटिव आल्या. परंतु इन्फेक्शन बघता निदान कठीण जात होतं. त्यादरम्यान माझ्या नवऱ्याने माझी खूप काळजी घेतली. इतर वेळी त्याच्याकडे वेळ नसतो. माझी मैत्रीण म्हणाली देखील,”अगं भाऊजींचा वेळ ,सहवास हवा होता त्यासाठी हे कारण का ग काढलं ?”

घरात सासूबाई, सासरे सगळे प्रचंड टेन्शनमध्ये होते. त्या खूप श्रद्धाळू ! त्या देखील त्यांच्या परीने सगळे उपाय करत होत्या. मला बोलता येतं नव्हतं. बोलूच शकत नव्हते. जीव घाबरावणारा खोकला होता. माझी दोन्ही मुलं दूर होती. छोटा बारावीला. मोठा येऊन दोन-तीन दिवस हॉस्पिटलला होता माझ्याबरोबर.

जेव्हा जेव्हा माझ्या अशा विचित्र टेस्ट करायला मला जायचं असायचं ! आणि त्याचा रिपोर्ट यायचा असायचा, तोपर्यंत खरंच मनस्थिती अतिशय वाईट होती. मी रडत होते. नवऱ्याने डोक्यावर हात ठेवला. मला माझी मुलं संसार सगळा दिसत होता, आणि मला इतक्या लवकर मरायचं नव्हतं. एक प्रार्थना मला खूप आवडते, मी डोळे पुसले. आणि आणि ती प्रार्थना म्हटली,” देवा !जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे .जी परिस्थिती मी बदलू शकते ती बदलण्याचे धैर्य मला मिळू दे .आणि या दोन्ही परिस्थितीतला भेद करण्याचे ज्ञान मला मिळू दे !”मी एकदा, दोनदा ही प्रार्थना म्हटली.

आजार माझ्या हातात नव्हता, आजाराचं निदान काय होणार आहे तेही माझ्या हातात नव्हतं. जे काही असेल त्याचा सामना करणं एवढेच फक्त माझ्या हातात होता. आणि तो सामना मला करायचा होता कारण माझे राम-लक्ष्मण मला डोळ्यासमोर दिसत होते. आणि टेस्ट साठी मी व्हील चेअर मध्ये बसायचे , आणि निघायचे तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असायचं की दोन बाजूंनी माझी दोन मुलं आहेत. राम आणि लक्ष्मण या स्वरूपात ! आणि माझी भीती पार दूर दूर पळून जायची. सुदैवाने टेस्ट निगेटिव्ह यायच्या. दहा दिवसानंतर मी घरी परत आले.

त्यानंतरही पंधरा-वीस दिवस मला परत बाहेर यायला लागले .पण आता मी घरी आले होते. माझ्या घरी, माझ्या संसारात , माझ्या माणसांमध्ये ! माझी बाग, आमचा मोलु (तोही बिचारा मला शोधत होता म्हणे ! आल्याबरोबर पायाशी येऊन बसला ) त्यानंतर दोन महिन्यानीच कोरोनाची पहिली लाट आली. त्याआधी काही” सारी” च्या केसेस औरंगाबादला झाल्या होत्या म्हणे! माझी सगळी लक्षणे “सारी “सारखीच होती. आणि म्हणूनच कदाचित काही समजत नव्हतं. पण डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली,मेहनत घेतली.

माझा नवरा मला नेहमी म्हणतो,” तुला तिथून ओढून आणलेले आहे, हात लावून आली आहेस तू वर !” तेव्हा मी म्हणते, हो अगदी खर आहे ! आणि मी तिथून शिकून आले,” की हे जीवन अतिशय सुंदर आहे. लाईफ इज ब्युटीफुल ! ” फ्रेंडस् , त्यानंतर आजपर्यंत एकदाही मला साध बोअर झालं आहे, असे एकदाही झालेलं नाही , याला कारण “तो साक्षात्कारी क्षण !”

सध्या सगळीकडे जे वातावरण आहे , त्यामुळे एक भीती, अस्वस्थता सर्वत्र दिसते. त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने,” लाईफ इज ब्युटीफुल”हे लक्षात घेऊन एन्जॉय केलं तर प्रतिकार शक्ती नक्की चांगली राहील, आणि या व्हायरसला आपण सगळे नक्की हरवू याची खात्री आहे मला ! तो साक्षात्कारी क्षणचं याला जबाबदार आहे.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button