‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं !’ ईडीच्या धाडीवर काँग्रेसची प्रतिक्रिया

Sachin Sawant

मुंबई : ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय)  पथकाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर धाड टाकली. यावर टीका करताना काँग्रेसने प्रश्न केला, गेल्या सहा वर्षांत एका तरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का? काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले – या धाडीमागे राजकारण आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडे डाव खेळते आहे.

लोकशाही धोक्यात आहे. भाजपावाल्यांकडे करोडोची संपत्ती, मग त्याची चौकशी का नाही? हे म्हणजे, आपला तो बाब्या,  दुसऱ्याचं ते कारटं! लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिले ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेषबुद्धीने धाडी टाकत आहेत. सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, ‘मनी लाँड्रिंग’चा होता का? भाजपाचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही.

भाजपा जेव्हा विरोधात होती तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करून भाजपामध्ये प्रवेश दिले! भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारी सगळं  सत्तेसाठी आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहेत, असे सावंत म्हणाले.

काँग्रेसच्या आरोपांचे भाजपाने खंडन केले आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याची माहिती ईडीचे प्रवक्ते देतील. काँग्रेसच्या काळात सीबीआय पोपट होता. कायद्याला धाब्यावर बसवून काँग्रेसने काम केले. भाजपाच्या काळात यंत्रणेला स्वातंत्र्य आहे. नियमाप्रमाणे संस्था काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही धास्ती वाटणे  साहजिक आहे, असे प्रत्युत्तर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER